'आंदोलनांची चिंता नको, कामाला लागा'; अमित शाहांचे मराठवाड्यातील ३० जागा जिंकण्याचे लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:10 PM2024-09-25T17:10:15+5:302024-09-25T17:10:23+5:30
कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या, अमित शाह यांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र
छत्रपती संभाजीनगर: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक आहे. त्यामुळे एकेक जागा जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करा. कुठल्याही आंदोलनाची चिंता न करता प्रत्येकाने तीन कुटुंबीयांचे मतदान करून घ्या आणि कुठल्याही परिस्थितीत मराठवाड्यातील किमान ३० जागा जिंकण्याचा संकल्प करा, असा कानमंत्र भाजपचे ज्येष्ठ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी पदाधिकारी संवाद बैठकीत दिला. तसेच प्रत्येक बूथवर दहा टक्के मते वाढवा, असे आवाहन केले.
मंगळवारी सायंकाळी एमजीएम कॅम्पसमधील रुक्मिणी सभागृहात झालेल्या मराठवाड्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, महामंत्री शिवप्रकाश, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, विजया रहाटकर, माजी खा. रावसाहेब दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुमारे ४५ मिनिटांच्या भाषणात गृहमंत्री शाह यांनी काँग्रेस, महाविकास आघाडीला टीकेचे लक्ष्य केले. मराठा आंदोलनाची चिंता करू नका ते सरकार आणि उपमुख्यमंत्री फडणवीस बघतील. मागच्यावेळी गुजरातेत ३ आंदोलने सुरू होती, तरीही आपण जिंकलो. लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढण्याची हीच संधी आहे, असेही त्यांनी सांगितले.
अंतर्गत गटबाजीचे वाद मिटवा....
पदाधिकारी, कार्यकर्त्यांमधील गटबाजीचे भांडण मिटवा. नेत्यांना आपल्या घरी मनधरणीला येण्याची गरज पडणार नाही, असे काम करा. भाजप मागणाऱ्याला काही देत नाही, मात्र न मागणाऱ्याला देतो. प्रत्येक बूथवरील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते भाजपमध्ये घेऊन या. विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांना घेऊन या विजय तुमचा होईल. ज्यांना आंदोलन करायचं त्यांना करू द्या, असा सल्ला गृहमंत्री शाह यांनी दिला.
फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल....
लोकसभा निवडणुकीत असलेली नकारात्मकता आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. लोकसभा निवडणुकीत शेतकरी आपल्यावर विशेष नाराज होते. दुष्काळ निसर्गाचा असला तरी तो सरकारने दिलेला असतो, अशी नाराजी लोकांमध्ये असते. महिला मतदानावर फोकस करा, कारण महिला मतदारांना जात, धर्म, पंथ याच्याशी काही घेणं नसते. ज्यांनी आपल्याला मदत केली आहे, त्यांच्या पाठीशी त्या सदैव राहतात, असा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.