चिंता नको... थोडी काळजी घेतली, तर सहज टाळू शकता डोळे येणे
By संतोष हिरेमठ | Published: August 10, 2023 02:02 PM2023-08-10T14:02:26+5:302023-08-10T14:02:56+5:30
रोज १,४०० वर लोकांचे येताहेत डोळे : घरगुती उपाय करणे पडू शकते दृष्टीसाठी महागात
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला आहे. एका दिवसात १,४०० पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, चिंता करण्यापेक्षा थोडी काळजी घेतली, तर डोळे येणे सहज टाळता येऊ येते, असे नेत्रतज्ज्ञांनी म्हटले.
हवेतून पसरत नाही, हाताच्या स्पर्शानेच लागण
डोळे आलेले असतील, तर घरीच थांबले पाहिजे. हवेतून अथवा डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्याने डोळे येत नाहीत, तर बाधित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना, जागेला स्पर्श केल्याने आणि हाताचा डोळ्यांना स्पर्श होऊन डोळे येण्याची शक्यता वाढते. डोळ्याला हात लावणे टाळावे.
-डाॅ. अरुण अडचित्रे, अध्यक्ष, नेत्ररोगतज्ज्ञ संघटना
स्वत:च्या मनाने ड्राॅप नको
डोळ्यांच्या साथीची स्थिती भयावह आहे. डोळे येण्याकडे दुर्लक्ष केल्यास तीव्रता वाढून दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. इतरांनी वापरलेला ड्राॅप सरसकट वापरू नये. त्यातून गुंतागुंत होऊ शकते. प्रत्येकाची त्रासाची स्थिती वेगवेगळी असते.
-डाॅ. मनोज सासवडे, नेत्ररोगतज्ज्ञ
विश्रांती घेणे महत्त्वाचे
डोळे येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळे आल्यानंतर तात्काळ नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, तसेच पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे; अन्यथा त्यातून डोळ्यांना त्रास वाढू शकतो.
-डाॅ. महेश वैष्णव, अध्यक्ष, शासकीय नेत्रचिकित्सा अधिकारी संघटना
डोळे आल्याची लक्षणे
- प्रारंभी, डोळ्यांत काही तरी गेल्यासारखे वाटणे.
- डोळे लाल होणे. रक्तस्राव झाल्यासारखे दिसणे.
- वारंवार पाणी गळणे.
- डोळ्यांना सूज येते.
- काही वेळा डोळ्यांतून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
- डोळ्यांना खाज येणे.
- डोळे जड वाटणे.
यातून टळू शकते डोळे येणे
- सर्वांत महत्त्वाचे म्हणजे डोळ्यांना हाताने स्पर्श करणे टाळावे.
- दिवसभरात काही ठरावीक वेळेनंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- हाताच्या स्वच्छतेसाठी सॅनिटायझरचा वापर करावा.
- एकमेकांचे टाॅवेल, रुमाल वापरणे टाळावे.
- सध्या हस्तांदोलन करणे टाळलेले बरे.
- डोळे आले असतील इतरांच्या संपर्कात येणे टाळावे.
- मधुमेह, प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्यांची पुरेशी काळजी घ्यावी.
- डोळे आल्यानंतर ३ ते ४ दिवस आराम करावा.
- स्वत:च्या मनाने डोळ्यात ड्राॅप टाकू नये. घरगुती उपचार करू नये.
जिल्ह्यातील स्थिती
- शहरात (मनपा) डोळे आलेले रुग्ण- ३,४६५
- ग्रामीण भागात डोळे आलेले रुग्ण- ५,४०७
८ ऑगस्ट रोजी निदान झालेले रुग्ण
- शहर (मनपा)- ४७३
- ग्रामीण- ९५४