रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:02 AM2021-06-18T04:02:51+5:302021-06-18T04:02:51+5:30

औरंगाबाद: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. औरंगाबादसह १५ जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचार घेत ...

At the door of relative administration if the patient dies | रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

रुग्ण मरणाच्या तर नातेवाईक प्रशासनाच्या दारात

googlenewsNext

औरंगाबाद: कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. औरंगाबादसह १५ जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचार घेत असून रुग्ण मरणाच्या दारात असल्यामुळे नातेवाइकांना म्युकरमायकोसिसच्या आजारावर लागणारे इंजेक्शन घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या दारात ताटकळत बसावे लागते आहे. इंजेक्शनची मागणी करीत गुरुवारी ४९ रुग्णांच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचा दरवाजा गाठला.

इंजेक्शनचा तुटवडा असून रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत ते कमी पडत आहेत. राज्यातील १५ जिल्ह्यांतून रुग्ण औरंगाबादमध्ये येत असल्यामुळे शासनाने सर्वाधिक इंजेक्शनचा पुरवठा या जिल्ह्यात करावा, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.

प्रत्येक रुग्णासाठी अ‍ॅम्फोटेरेसीन बी हे ३ ते ५ इंजेक्शन दररोज लागत आहेत. १०० पेक्षा जास्त इंजेक्शनचा पुरवठा प्रशासनाला होत नाही. मागील ३ दिवसांपासून इंजेक्शन मिळत नसल्यामुळे रुग्ण नातेवाइकांची धावपळ होत आहे. इंजेक्शन मिळत नाहीत, रुग्ण नातेवाइकांनी आपापल्या परीने ते उपलब्ध करावेत, असे सांगून खासगी रुग्णालये हातवर करीत आहेत.

४९ रुग्ण नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात

४९ रुग्णांचे नातेवाईक गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत इंजेक्शनसाठी ठाण मांडून होते. रुग्ण मरणाच्या दारात असून आता खासगी हॉस्पिटलदेखील आम्हाला सहकार्य करीत नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याचे विनय साखला यांनी सांगितले. किरण हजारी म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गतदेखील सदरील आजारावर उपचार मिळणे दुर्लभ झाले आहे. जावेद तांबोळी, सुदर्शन पवार, केतकी जोशी, नामदेव सोनवणे यांनीदेखील अशी भूमिका मांडली. बाहेर इंजेक्शन भेटत नाही, प्रशासनाकडून उपलब्ध होत नाही. या सगळ्या खेचाखेचीत रुग्णांची हेळसांड होत असल्याचे मत नातेवाइकांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती अशी

इंजेक्शनचा तुटवडा आहे. शासनाकडून वाढीव इंजेक्शन मिळावेत, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. जसे इंजेक्शन पुरविले जात आहेत, तसे रुग्णांचा आकडा पाहून त्यांना दिले जात आहेत. असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

औरंगाबादला विशेष पुरवठा व्हावा

रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी करण्यासाठी औरंगाबादेत राज्यभरातून रुग्णाचे नातेवाईक येत राहिले. तसेच आता म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी शहरात राज्यातील १५ जिल्ह्यातील रुग्ण आहेत. औरंगाबादचे २५८ रुग्ण असून ४४६ रुग्ण मराठवाड्यासह इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामुळे औरंगाबादला इंजेक्शनचा रुग्ण आकडा पाहून पुरवठा होणे गरजेचे आहे. ठाणे, नंदुरबार, सोलापूर, पुणे, धुळे, अकोला, लातूर, नाशिक, हिंगोली, नांदेड, अहमदनगर, जळगाव, बीड, परभणी, जालना येथील रुग्ण सध्या औरंगाबादमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये विशेष पातळीवर इंजेक्शनचा पुरवठा शासनाने करावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Web Title: At the door of relative administration if the patient dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.