ऑरिक सिटीला ‘समृद्धी’ची दारे लवकरच उघडणार, इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात
By बापू सोळुंके | Published: March 21, 2024 05:50 PM2024-03-21T17:50:08+5:302024-03-21T17:50:47+5:30
‘ऑरिक’मधून थेट समृद्धी महामार्गाला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात
छत्रपती संभाजीनगर : ऑरिक सिटी, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांना थेट समृद्धी महामार्गाला लवकरच कनेक्ट मिळणार आहे. ऑरिक सिटीपासून समृद्धीला कनेक्ट करणाऱ्या रस्त्याचे आणि इंटरचेंजचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.
दिल्ली, मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरअंतर्गत आंतरराष्ट्रीय औद्योगिक सुविधा असलेल्या ऑरिक सिटीचा शेंद्रा आणि बिडकीन औद्योगिक पट्ट्यामध्ये पुढील दहा वर्षांत हजारो उद्योग येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या या डीएमआयसीच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून अवघ्या ९०० मीटर अंतरावर समृद्धी महामार्ग आहे. तेथेच समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी मिळावी, अशी येथील उद्योजकांची मागणी होती. उद्योजकांच्या मागणीची दखल घेत सन २०२२ मध्ये शासनाने ऑरिक शेंद्रा ते समृद्धी महामार्गादरम्यान ९०० मीटर रस्त्यासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन केले. यानंतर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि ऑरिक सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने निविदा प्रक्रिया राबवून समृद्धी महामार्गापर्यंत रस्ता उभारणे, इंटरचेंज उभारणे, टोल नाका उभारणे आदी कामासाठी ४१ कोटी रुपयांचा ठेका देण्यात आला. मागील १० महिन्यांत या रस्त्याचे काम झपाट्याने सुरू झाले. रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे. शिवाय समृद्धी महामार्गावर चढणे आणि उतरण्यासाठी दोन वेगवेगळ्या लेन करण्यात आल्या आहेत. दोन्ही स्वतंत्र लेनजवळ स्वतंत्र टोलनाके उभारण्यात आली आहेत.
कनेक्टिव्हिटी औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाची
बीड, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनचालकांना समृद्धी महामार्गावर जायचे असेल, तर त्यांना करोडी येथून अथवा हर्सूलमार्गे सावंगी येथील इंटरचेंजवरून समृद्धीवर कनेक्ट व्हावे लागते. हर्सूलमार्गे जायचे असेल तर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, तसेच करोडीवरून समृद्धीवर जाण्याऐवजी सर्वांत जवळचा आणि वाहतूक कोंडी नसलेला रस्ता म्हणून शेंद्रा येथील इंटरचेंज वाहनधारकांसाठी फायदेशीर ठरू शकते.
शेतकऱ्यांनी रोखला होता वर्षभर रस्ता
समृद्धी महामार्गासाठी जयपूर येथील शेतकऱ्यांची चार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली. यात तेथील काही शेतकऱ्यांची घरेही संपादित करण्यात आली. यामुळे योग्य मोबदला मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी सुमारे वर्षभर या रस्त्याचे काम रोखले होते. एमआयडीसीचे तत्कालीन प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मोबदला देण्याची तयारी दर्शविली. यानंतर शासनाने त्यांना ११ कोटी रुपयांचा मावेजा शेतकऱ्यांना दिला.