आठ हजार लसीचे डोस काही तासातच संपले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:04 AM2021-07-11T04:04:31+5:302021-07-11T04:04:31+5:30
औरंगाबाद : शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात ...
औरंगाबाद : शहरात ५५ हजारांहून अधिक नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडून शुक्रवारी रात्री फक्त ८ हजार लस देण्यात आल्या. शनिवारी ३९ केंद्रांवर अवघ्या काही तासातच लस संपल्या. ७ हजार नागरिकांना फक्त दुसरा डोस देण्यात आला. ७०० पेक्षा अधिक नागरिकांना पहिला डोस दिला. मनपाकडे आता लसीकरण मोहीम राबविण्यासाठी लसचा मुबलक साठा नाही.
१८ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्याची घोषणा केंद्राने केली आहे. शहराला दररोज २० हजार डोसची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात ८ ते १० हजारच लस मिळत आहे. एकदा साठा मिळाल्यानंतर किमान चार ते पाच दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवावी लागते. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरात सध्या ५५ हजारहून अधिक नागरिकांना दुसऱ्या डोसची प्रतीक्षा आहे. या आठवड्यांत चार दिवसानंतर महापालिकेला ८ हजार लस मिळाल्याने शनिवारी ३९ केंद्रावर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांनाच प्राधान्य देण्यात आले. त्याकरिता ३४ केंद्रांवर व्यवस्था केली. लस आल्याचे कळताच सकाळपासूनच केंद्रावर कुपन घेण्यासाठी नागरिकांची गर्दी केली होती. कुपन घेतल्यानंतरही काही नागरिक थेट केंद्रावर लस घेण्यासाठी दाखल झाले. दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची केंद्रावर प्रचंड गर्दी उसळली. प्रत्येक केंद्रावर १५० लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले. दिवसभरात साडेसहा हजार नागरिकाचे लसीकरण झाले. अनेकांना दुसरा डोस न घेताच माघारी फिरावे लागले.
पहिल्या डोससाठी ऑनलाईन नोंदणी
पहिला डोस घेण्यासाठी नागरिकांना कोविन अॅपवर नोंदणी करण्याचे आवाहन मनपाने केले होते. पहिल्या डोससाठी पाच केंद्रांवर व्यवस्था केली होती. प्रत्येक केंद्रावर २०० लस देण्यात आल्या. त्यापैकी सातशे ते आठशे नागरिकांना पहिला डोस देण्यात आला. उद्या रविवार, ११ जुलै रोजी सुटी असल्याने लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. शासनाकडून साठा प्राप्त झाला तरच सोमवारी लसीकरण शक्य आहे.