औरंगाबादकरांवर दुहेरी संकट; कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2020 12:30 PM2020-04-10T12:30:12+5:302020-04-10T12:33:05+5:30
कोरोनाच्या विळख्यात 'सारी'ने बळी जाण्याचे प्रमाण अधिक
औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात सारी'चे (सिव्हिअर अॅक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स) संकट वाढत आहे. कोरोनाच्या एका रुग्णामागे 'सारी'चे ५ रुग्ण आढळून येत आहे. शहरात कोरोनापेक्षा सध्यातरी सारीने बळी जाणाऱ्यांची संख्या अधीक असल्याने वैद्यकीय क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे.
शहरात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली आहे. आतापर्यंत एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे एकच चिंता व्यक्त होत आहे. मात्र, सध्या कोरोना एवढ्याच 'सारी' जिल्ह्यासाठी संकट ठरत आहे. शहरात २४ मार्च रोजी कोरोनासदृश्य सारीने एकाचा मृत्यू झाल्याचे समोरे आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. परंतु त्यांनतरही सारीच्या रुग्णांचा बळी जाणे सुरूच आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रनेचे सारीकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोना आणि सारीची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे सारीच्या प्रत्येक रुग्णाची कोरोना चाचणी केली जात आहे. ही चाचणी निगेटिव्ह येताच सुटकेचा निःस्वास सोडला जात आहे.
मात्र, निगेटिव्ह अहवाल आलेले सारीचे रुग्णही मृत्युमुखी पडत आहे. याकडे आरोग्य विभागाने गंभीरतेने पाहण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. शहरात आतापर्यंत कोरोनाचे १७ रुग्ण आढळून आले. मात्र, एका कोरोनाच्या मागे पाच सारीचे रुग्ण आढळत असल्याने काळजी व्यक्त होत आहे. सारीच्या रुग्णांच्या संख्याने आजघडीला शंभरी पार केली आहे. आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू या आजाराने २९ मार्च ते ७ एप्रिल या १० दिवसात ११ जणांचे बळी घेतले. त्यांच्यावर घाटीत उपचार सुरू होते. यात १० जनांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह होता. तर एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. ही संख्या आता १२ वर गेल्याचे गुरुवारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले. या कारणाने होतो सारी एकदम सर्दी, तापाचे प्रमाण जास्त , खूप अशक्तपणा , निमोनिया, श्वसन दाह, छातीत दुखणे, रक्त शुद्धीकरण क्षमता कमी होणे आदी सारीचे लक्षणे आहेत. हा श्वसन मार्गाचा गंभीर आजार आहे. यात फुफ्फुसात पाणी (एआरडीएस), काही भागाला सूज येते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीमुळे याला सामोरे जाण्याची वेळ येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यांना आहे सर्वाधिक धोका सरीचा लहान मुले आणि जेष्ठ नागरिक , प्रतिकार शक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती, मधुमेह, ह्रदयरोग आलेल्या रुग्णांना सारीचा सर्वाधिक धोका असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
प्रमाण वाढले सारीचे प्रमाण सध्या वाढले आहे. श्वसन संस्थेचा गंभीर आजार म्हणून सारीकडे पाहिले जाते. विषाणू, जिवाणू आणि बुरशीमुळे सारी होऊ शकतो. फुफ्फुसात पाणी होते. काही भागावर सूज येते. दमन लागत असल्याने रुग्णाला बोलताही येत नाही. त्यामुळे ऑक्सिजन द्यावे लागते.
- डॉ. गजानन सुरवाडे, सहयोगी प्राध्यापक, औषधवैद्यकशास्त्र विभाग, घाटी
गंभीरतेने घ्यावे लागेल कोरोनासारखी लक्षणे मात्र, तपासणी अहवाल निगेटिव्ह येणारा रुग्ण हा सरीचा म्हटला जातो. सध्या एका करोनाच्या रुग्णामागे सारीचे पाच रुग्ण आढळत आहे. सारीचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. याला गंभीरतेने घेतले पाहिजे.
- डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, औरंगाबाद
फिजिशियन असोसिएशन वेळीच लक्ष द्यावे आयसीयूमध्ये कोरोना संशयित रुग्ण असतो. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला तर सारीचा रुग्ण म्हणून उपचार केला जातो. दम लागणे, ताप येणे, थकवा येणे, जुलाब आशा गोष्टीकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. - डॉ. आनंद निकाळजे