दुप्पट भाव, तरी विक्रीत वाढ; सूरतहून रामाचे आठ लाख ध्वज छत्रपती संभाजीनगरात
By प्रशांत तेलवाडकर | Published: January 19, 2024 02:43 PM2024-01-19T14:43:38+5:302024-01-19T14:45:01+5:30
प्राणप्रतिष्ठा जवळ येताच ध्वजाचे तीन दिवसांत वाढले दुप्पट भाव
छत्रपती संभाजीनगर : ‘ध्वज पताका घर-घर लहराए, दीप जला गीत मंगल गाए’ असे गीत सध्या देशभरात गाजत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. २२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत आहे. या धार्मिक सोहळ्याला अविस्मरणीय बनविण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने प्रयत्न करीत आहे. यानिमित्त घराघरांवर श्रीरामाचा भगवा ध्वज लावण्यात येणार आहे, याकरिता व्यापारी सरसावले असून, सूरतहून सुमारे आठ लाख ध्वज जिल्ह्यात विक्रीसाठी आणण्यात आले आहे.
ध्वजावर श्रीराम, मंदिराचे चित्र
सूरत येथून प्रिंट करून आलेल्या भगव्या ध्वजावर धनुर्धारी प्रभू श्रीरामचंद्र व पाठीमागील बाजूस अयोध्येतील मंदिराचे प्रिंट छापण्यात आले आहे. अशा ध्वजांना मोठी मागणी आहे.
चार प्रकारांतील ध्वज
बाजारात दाखल झालेल्या ध्वजामध्ये २० बाय ३० इंच, ३० बाय ४५ इंच, ४० बाय ६० इंच व ६० बाय ९० इंच असे चार प्रकार आहेत. शहरात चार होलसेलर असून, शेकडो विक्रेते ध्वज विकत आहे. याशिवाय शहरातून जिल्हाभरात ध्वज विक्रीला गेले आहे.
तीन दिवसांत वाढले भाव
२० ते २२ जानेवारी दरम्यान अयोध्येत प्राणप्रतिष्ठा महोत्सव होत आहे. यानिमित्त मंदिरांवर व घराघरांवर भगवे ध्वज उभारण्यात येत आहे. जसजशी प्राणप्रतिष्ठा महोत्सवाची तारीख जवळ येत आहे. तसतसे बाजारात ध्वजाला मागणी वाढत आहे. मागील तीन दिवसांत ध्वजाचे भाव दुप्पट, तीनपट्टीने वाढले आहेत. २० बाय ३० इंचचा ध्वज मंगळवारी २० रुपयांना मिळत तो बुधवारी ३५ रुपये व आज ६० रुपयांना विकला जात होता. ३० बाय ४५ इंच ध्वज तीन दिवसांपूर्वी ३५ रुपयांना मिळत तो आज ९० रुपयांना विकत होता. ४० बाय ६० इंच ध्वज ६५ रुपयांहून थेट १४० रुपये, तर ६० बाय ९० इंचाचा ध्वज बुधवारी १४० रुपये होता. आज २५० रुपये भाव करण्यात आला.
सुरतहून पुरवठा कमी
होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, सुरतहून देशभरात ध्वज विक्रीला पाठविले जात आहे. ध्वजाला प्रचंड मागणी, पण उत्पादन कमी आहे. यामुळे ध्वज पुरवठ्यात तुटवडा जाणवत आहे. यामुळे किमती वाढत आहेत.
पहिल्यांदा ध्वजाला प्रचंड मागणी
मागील २० वर्षांपासून मी हंगामी व्यवसाय करीत आहे. मात्र, यंदा श्रीरामाच्या ध्वजाला प्रचंड मागणी आहे. यापूर्वी कोणत्याच झेंड्याला एवढी मागणी नव्हती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा बदल नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ध्वज आणल्यावर हातोहात ध्वजाची विक्री होत आहे. ध्वजासोबत काठीलाही मागणी आहे. मागील तीन दिवसांत मी ५०० ध्वज विकले. आणखी ५०० ध्वजांची आर्डर दिली, पण आज २०० ध्वज होलसेलरकडून मिळाले. - विक्रांत अकोलकर, व्यावसायिक