औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण; जालना - खामगाव रेल्वेमार्गाला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 12:19 PM2022-11-29T12:19:36+5:302022-11-29T12:20:42+5:30
रेल्वे मंत्रालयाने प्रस्ताव पाठविला नीती आयोगाकडे
औरंगाबाद :औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि जालना - खामगाव रेल्वेमार्गाला रेल्वे मंत्रालयाने ‘ग्रीन सिग्नल’ दाखविला आहे. हे दोन्ही प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने मूल्यांकनासाठी नीती आयोगाकडे पाठविले आहेत. विशेष म्हणजे रेल्वे मंत्रालयाने या प्रकल्पांसाठी गुंतवणुकीचे समर्थन केले आहे. त्यामुळे हे प्रकल्प मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या परभणी - मनमाड या २९१ कि.मी. अंतर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला रेल्वे मंत्रालयाने ‘रेड सिग्नल’ दाखविला आहे. मात्र, त्याच वेळी अंकई (मनमाड) ते औरंगाबाद या ९८ कि.मी. मार्गाच्या दुहेरीकरणाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देण्यात आली. जुलैअखेर हे सर्वेक्षणही पूर्ण झाले.
जालना - खामगाव रेल्वेमार्गाच्या कामाला रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी मिळाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जनतेची १०६ वर्षांची मागणी अखेर मंजूर झाली. नवीन ‘मॉडिफाइड इकॉनॉमिक इंटरनल रेट ऑफ रिटर्न’ मॉडेलच्या आधारे प्रकल्पासाठी गुंतवणुकीचे समर्थन करत रेल्वे मंत्रालयाने हे दोन्ही प्रकल्प प्रस्तावांचा संच नीती आयोगाकडे मूल्यांकनासाठी पाठवला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रतीक्षेत असलेले प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुहेरीकरण का गरजेचे?
औरंगाबाद - अंकई रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्याने रेल्वेगाड्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. शिवाय रेल्वेचा वेग वाढेल. एकेरी मार्गावर एखाद्या रेल्वेचे इंजिन बंद पडले तर संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते. हा प्रकार दुहेरीकरणामुळे कायमचा थांबेल.