सिल्लोड ठाण्यासमोर नातेवाईकांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2017 12:55 AM2017-09-05T00:55:10+5:302017-09-05T00:55:10+5:30
केळगाव येथील ग्रामपंचायत शिपायाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण तापतच चालले असून या प्रकरणी सोमवारी दिवसभर ग्रामीण पोलीस ठाण्यात नातेवाईक व काही पुढाºयांनी ठिय्या आंदोलन करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : तालुक्यातील केळगाव येथील ग्रामपंचायत शिपायाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे प्रकरण तापतच चालले असून या प्रकरणी सोमवारी दिवसभर ग्रामीण पोलीस ठाण्यात नातेवाईक व काही पुढाºयांनी ठिय्या आंदोलन करुन खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दरम्यान, मयत ग्रा.पं. शिपाई विठ्ठल वाघ यांचा मृतदेह सोमवारी रात्रीपर्यंत सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात पडून होता.
दुपारपर्यंत नरमलेले पोलीस कलम ३०६ व अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्यास तयार होते, पण खुनाचा गुन्हा दाखल करा तरच प्रेत ताब्यात घेऊ, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने आता अर्ज द्या, चौकशी करुन नंतर गुन्हे दाखल करू,अशी भूमिका उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरु यांनी घेतली.
सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचे पती व इतर चार जणांनी संगनमत करुन वाघ यांचा खून केल्याचा आरोप मयताचा मुलगा व मुलगी यांनी केला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व आ. अब्दुल सत्तार यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र, नातेवाईक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलीस प्रशासन पेचामध्ये सापडले आहे. रात्री उशिरापर्यंत तडजोडीचे प्रयत्न सुरू होते.