औट्रम घाटातील बोगद्याच्या ‘डीपीआर’चे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:22 PM2018-09-19T19:22:38+5:302018-09-19T19:23:17+5:30
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, चाळीसगावजवळ औट्रम घाटात ५ कि़मी. अंतराच्या टनेलचे काम हाती घेण्यात येणार आहे.
औरंगाबाद : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, चाळीसगावजवळ औट्रम घाटात ५ कि़मी. अंतराच्या टनेलचे काम हाती घेण्यात येणार आहे. व्हायाबिलिटी अहवालानंतर याचा कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. मार्चपर्यंत याचा अहवाल येण्याची शक्यता असून, त्यानंतर याच्या कामाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ चे काम गत काही वर्षांपासून सुरू आहे. बहुतांश ठिकाणी भूसंपादन पूर्ण झाले असून, काम प्रगतिपथावर आहे. चाळीसगाव परिसरात घाट असल्याने येथे ५ कि़मी. अंतराचा बोगदा तयार करण्याचे प्रस्तावित होते. या कामाला जवळपास ५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रस्तावाची वस्तुनिष्ठता तपासण्याचे आदेश संबंधित अभियंत्यांना देण्यात आले. याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हिरवा कंदिल दाखवला. ‘एम्बर्ग’ या एजन्सीला औट्रम घाट टनेलच्या कामाचा डीपीआर तयार करण्याचे काम देण्यात आले आहे. आगामी मार्चपर्यंत डीपीआरचे काम होईल. त्यानंतर कामाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल.
तीन पर्यायांवर विचार सुरू
टनेलच्या कामाचे कंत्राट बीओटी, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अथवा हायब्रीड अॅन्युटी पद्धतीवर दिले जावे, यावर डीपीआर अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बारकाईने अभ्यास केला जात आहे
औट्रम घाटातील ५ कि़मी. अंतर असलेल्या या टनेलचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी अत्यंत बारकाईने याचा अभ्यास केला जात आहे. मार्चमध्ये डीपीआर तयार होईल त्यानंतर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाकडे या कामाचा प्रस्ताव पाठविला जाईल.
- अजय गाडेकर, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, विभाग औरंगाबाद