डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात कार्यक्रमास पाहुणे बोलावण्यावर ‘अभाविप’ची सेन्सॉरशिप?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 12:38 AM2018-02-02T00:38:26+5:302018-02-02T10:45:19+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात आयोजित नवीन बँकिंग विधेयकावरील चर्चासत्राला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिका-यांनी आक्षेप घेतला आहे. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच का बोलावण्यात आले, असा जाब त्यांनी विचारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात आयोजित नवीन बँकिंग विधेयकावरील चर्चासत्राला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिका-यांनी आक्षेप घेतला आहे. विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच का बोलावण्यात आले, असा जाब त्यांनी विचारला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात नियोजन मंडळातर्फे सातत्याने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. केंद्र सरकार बँकेसंदर्भातील ‘वित्तीय निराकरण आणि ठेव विमा विधेयक’ हे विधेयक संसदेत मांडणार आहे. या विधेयकावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ देवीदास तुळजापूरक र आणि डाव्या विचाराचे नेते डॉ. भालचंद्र कांगो यांना बोलावण्यात आले आहे. हा कार्यक्रम विभागाच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२) दुपारी १२ वाजता होणार आहे. ही माहिती कळल्यानंतर अभाविपच्या पदाधिका-यांनी अर्थशास्त्र विभागप्रमुखांची भेट घेत विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनाच का बोलावले? संबंधित वक्ते या विषयातले तज्ज्ञ आहेत का? अशी विचारणा त्यांनी विभागप्रमुखांना केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर विभागप्रमुखांनी त्यांना असा काही प्रकार नसल्याचे सांगत, संबंधित वक्ते हे बँकिंग क्षेत्रातील जाणकार आहेत. यात त्यांनी अनेक वर्ष कार्य केले आहे, असे स्पष्टीकरण दिले. मात्र तरीही ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी यापुढे असे होऊ नये, असा दम विभादप्रमुखांना दिल्याचे समजते. घडलेल्या प्रकारामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांमध्ये कार्यक्रम आयोजनाविषयी दबाव आहे.
कार्यक्रम घ्यावेत की नाही, असा प्रश्न निर्माण होत असल्याचेही काही प्राध्यापकांनी नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले. यापूर्वी कोणत्याही विद्यार्थी संघटनेने पाहुणे कोण बोलावले याची विचारणा केलेली नाही. मात्र आता ‘अभाविप’ची पाहुणे बोलावण्यावर सेन्सॉरशिप लागू झाली आहे काय? असा सवालही काही प्राध्यापकांनी उपस्थित केला. याविषयी विभागप्रमुख डॉ. धनश्री महाजन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला.