औरंगाबादेत साकारतेय डाॅ. आंबेडकर संशोधन केंद्र, बाबासाहेबांच्या विचार-कार्याचे चिंतन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 04:49 AM2021-04-14T04:49:26+5:302021-04-14T06:49:39+5:30

Dr. Ambedkar Research Center in Aurangabad : अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून या संशोधन केंद्राची उभारणी केली जात आहे. 

Dr. Ambedkar Research Center in Aurangabad, Contemplation of Babasaheb's Thoughts and Works | औरंगाबादेत साकारतेय डाॅ. आंबेडकर संशोधन केंद्र, बाबासाहेबांच्या विचार-कार्याचे चिंतन 

औरंगाबादेत साकारतेय डाॅ. आंबेडकर संशोधन केंद्र, बाबासाहेबांच्या विचार-कार्याचे चिंतन 

googlenewsNext

- विजय सरवदे

औरंगाबाद : महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांच्या कार्यावर जागतिक पातळीवर व्यापक चिंतन, संशोधन व्हावे, या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात संशोधन केंद्र आकार घेत आहे. अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या खासदार निधीतून या संशोधन केंद्राची उभारणी केली जात आहे. 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ शोषित, पीडितांचे कैवारी होते, असे नव्हे तर ते द्रष्टे नेते होते. स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्वज्ञ, समाजसुधारक, संसदपटू, पत्रकार, वकील, थोर विचारवंत होते. ते लोकशाहीचे कट्टर पुरस्कर्ते, शेतकरी, कामगार, स्त्रीमुक्तीचे उद्धारक होते. वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. त्यांच्या अशा विविध पैलूंवर जागतिक पातळीवर संशोधन व्हावे, यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘डॉ. आंबेडकर संशोधन केंद्रा’च्या माध्यमातून पाऊल उचलले आहे.  
वृत्तपत्रविद्या व लोकसंवाद विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. सुधीर गव्हाणे यांनी सेवानिवृत्तीच्या सहा महिने अगोदर या संशोधन केंद्राची संकल्पना समोर आणली. डॉ. गव्हाणे यांनी आंबेडकर अध्यासन केंद्राच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र जाधव यांना एका कार्यक्रमासाठी विद्यापीठात निमंत्रित केले होते. त्यावेळी डॉ. जाधव यांनी आपल्या खासदार निधीतून पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यापैकी आतापर्यंत दोन कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यातून सोनेरी महलच्या पुढे भव्य अशी वास्तू उभारली जात आहे.      


मेमोरियल नव्हे रिसर्च सेंटर
आंबेडकर रिसर्च सेंटरमध्ये जागतिक पातळीवर संशोधनाला प्राधान्य देण्यात येणार आहे. यात बाबासाहेबांसंबंधी भव्य असे ग्रंथदालन, ऑडिटोरियम, अभ्यासिका आकाराला येत आहे. या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्याला रिसर्च फेलोशिप देण्याचीही संकल्पना आहे.

Web Title: Dr. Ambedkar Research Center in Aurangabad, Contemplation of Babasaheb's Thoughts and Works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.