विद्यापीठाचे नवीन वेळापत्रक जाहीर; ऑनलाईन पद्धतीने पदवीचे पेपर ३ मे, तर पदव्युत्तरच्या परीक्षा ५ मेपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 01:04 PM2021-04-24T13:04:14+5:302021-04-24T13:08:25+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ एप्रिलपासून स्थगित केल्या होत्या. आता बीए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे उर्वरित पेपर ३ मे, तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा ५ मेपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.
गुरुवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, राज्यातील सर्व विद्यापीठांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा फक्त ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या दि्वतीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा १६ मार्चपासून, बीए, बीएस्सी व बीकॉम प्रथम वर्षाची परीक्षा ७ एप्रिलपासून, तर ६ एप्रिलपासून अभियांत्रिकीसह सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या होत्या. या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात आल्या.
दरम्यान, राज्य शासनाने १५ मार्चपासून कडक निर्बंध लागू केल्यामुळे १५ ते ३० एप्रिलदरम्यान होणारे सर्व अभ्यासक्रमांचे पेपर स्थगित करून ते पुढे ढकलण्यात आले. या स्थगित परीक्षेचे उर्वरित पेपर आता ३ मेपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठ व महाविद्यालयीन पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ५ मेपासून सुरू होणार आहे. यासाठी महाविद्यालयीनस्तरावर संगणक समन्वयकांची (आयटी कॉर्डिनेटर) संख्या दुपटीने वाढविण्यात येणार आहे. एकही विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची काळजी संबंधित महाविद्यालयाने घ्यायची आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा व भवितव्य महत्त्वाचे
सलग दुसऱ्यावर्षी उन्हाळ्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर बनल्यामुळे राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे आता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परिस्थितीत विद्यार्थ्यांची आरोग्य व सुरक्षा महत्त्वाची असून त्यांचे भवितव्य देखील महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा, वेळेत निकाल व पुढील शैक्षणिक सत्र लवकर सुरू करणे गरजेचे आहे. केवळ तांत्रिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची काळजी संबंधित महाविद्यालयांनी घ्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले आहे.