विद्यापीठाच्या तज्ज्ञ समित्या, पार्ट्या अन् लॉबिंग; उच्चशिक्षण क्षेत्रात चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 05:51 PM2021-10-13T17:51:53+5:302021-10-13T18:55:14+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते.
- राम शिनगारे
औरंगाबाद : विद्यापीठाकडून प्राध्यापकांच्या पदोन्नती, महाविद्यालयांच्या संलग्नीकरणासाठी पाठविण्यात येणाऱ्या ‘ तज्ज्ञ ’ समित्या, त्या समित्यांकडून देण्यात येणारे अहवाल आणि रात्री उशिरापर्यंत होणाऱ्या ओल्या पार्ट्या सध्या औरंगाबादच्या उच्च शिक्षण क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. समित्यांवर सदस्य म्हणून जाण्यासाठी लॉबिंग करणाऱ्या टोळ्या निर्माण झाल्याची संतप्त प्रतिक्रिया सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. एम. ए. वाहूळ यांनी व्यक्त केली.
औरंगाबाद शहरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. राजन शिंदे यांची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर उच्चशिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. उलटसुलट चर्चेला उधाण आले. हत्या झालेल्या रात्री प्रा. शिंदे हे बाहेरच जेवण करुन रात्री ११.३० वाजता घरी आले होते. त्यापूर्वी ते जळगाव विद्यापीठातून औरंगाबादेत आलेल्या एका प्राध्यापकासोबत होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत पुढे आली. त्यावरून विद्यापीठांच्या समित्यांच्या चर्चा रंगल्या आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यानुसार संलग्नता देण्यासाठी विद्यापीठ प्रत्येक महाविद्यालयात प्रतिवर्षी एक तज्ज्ञ समिती पाठवते. या समितीवर अध्यक्ष आणि सदस्य म्हणून जाण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे प्रचंड लॉबिंग केली जाते. त्यावरच विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळाच्या निवडणुका लढविल्या जातात. एका समितीवर तीन ते चार जणांचे समायोजन होते.
विद्यापीठातील अधिकारी प्रत्येक गटाचा रोष येऊ नये, यासाठी विविध गटांच्या सदस्यांची वर्णी समित्यांवर लावतात. या समित्यांच्या माध्यमातून प्रत्येक अहवाल ‘मॅनेज’ केला जातो. तीच अवस्था प्राध्यापकांच्या पदोन्नतीच्या समित्यांची झालेली आहे. प्रत्येक गटाने महाविद्यालये वाटून घेतलेले आहे. वर्षानुवर्षे काही प्राध्यापक एका महाविद्यालयाच्या समित्यांवर जातात. समित्यांच्या माध्यमातून सकारात्मक अहवाल दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत ‘श्रम’ परिहार चालतो, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्यांनी दिली. या लाॅबिंगमध्ये सहभागी होणाऱ्या अभ्यासू प्राध्यापकांना मात्र, कोठेच संधी मिळत नसल्याचेही चित्र उच्च शिक्षण वर्तुळात निर्माण झालेले आहे.
गुणवत्तेवर समित्या जात नाहीत
विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रात अलिकडे गुणवत्तेवर समित्या पाठविण्यात येत नाहीत. वकूब नसलेल्या लोकांना पाठवले जाते. त्यांचे अहवालही तटस्थ नसतात. सकारात्मक अहवाल देण्यासाठी एक तंत्र विकसित झाल्याचे दिसून येते. त्यातूनच पार्टी, पाकीट संस्कृती उदयाला आली आहे. त्यामुळेच उच्च शिक्षण क्षेत्राची पीछेहाट होत असल्याचे माझे निरीक्षण आहे.
- डॉ. एम. ए. वाहूळ , सेवानिवृत्त प्राचार्य
समित्यांची निवड गंभीर वळणावर
विद्यापीठाकडून महाविद्यालयाच्या संलग्नतेसाठी पाठविण्यात येणाऱ्या समित्या हा गंभीर विषय बनला आहे. समित्यांवर जाण्यासाठी प्राध्यापकांमध्ये स्पर्धा लागलेली असते. मात्र, कोणत्याही समित्यांकडून तटस्थपणे मूल्यमापन होत नाही. त्यास काही अपवाद ही आहेत. सत्य बोलल्यास प्राध्यापक अंगावर येतात. मात्र, या सगळ्या प्रकारामुळे मराठवाड्यातील युवकांच्या पिढ्या उद्ध्वस्त करण्याचे काम होत आहे. ते कुठेतरी थांबले पाहिजे.
-ॲड. संजय काळबांडे, सदस्य, अधिसभा, विद्यापीठ