विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान

By योगेश पायघन | Published: November 19, 2022 07:21 PM2022-11-19T19:21:47+5:302022-11-19T19:22:36+5:30

भारत ‘विश्वगुरु’ नक्की बनेल -डॉ. विजय भटकर

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 62nd Convocation: Nitin Gadkari, Sharad Pawar honored with D.Litt | विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान

विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ: नितीन गडकरी, शरद पवार यांचा डी.लिट ने सन्मान

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभात केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डि.लीट ही मानद देवून शनिवारी (दि.१९) सन्मानित करण्यात आले. या दीक्षांत समारंभात ४३३ संशोधक विद्यार्थ्यांना यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. शताब्दी वर्षापर्यंत भारत विश्वगुरु नक्की बनेल, असा ठाम विश्वास सूपर कॉम्टयूटरचे जनक पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी दीक्षांत भाषणात व्यक्त केला.

विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत सोहळा शनिवारी नाट्यगृहात शिस्त व नियोजनबद्ध पार पडला. दिक्षांत मिरवणूकीने सोहळ्याला सुरूवात झाली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खा. शरद पवार यांना कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते मानव्य विद्या शाखेतील डि.लीट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.चारही विद्याशाखेतील मिळून ४३३ संशोधकांना ‘पीएच.डी’ पदवीने सन्मानित करण्यात आले. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा १४६, वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र ४८, मानव्य विद्या ४६३ व तर आंतरविद्या शाखांतील ७६ संशोधक विद्यार्थ्यांचा समावेश होता. डाॅ. भटकर म्हणाले, जगातील तिसऱ्या क्रमाकांची आर्थिक महासत्ता म्हणून ओळख निर्माण झाली आहे. अमृत महोत्सवी वर्षांतील प्रगतीची घोडदोड सुरू असतांना देशात आज एक हजारहून अधिक विद्यापीठांची स्थापना झाली. उच्च शिक्षण क्षेत्रात नवीन शैक्षणिक धोरणानंतर मोठे फेरबद्दल होत आहे. तंत्रज्ञानात प्रगती करत असतांना ते मातृभाषेत लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न सुरू झाला तो नव्या शैक्षणिक धोरणात दिसून येईल. प्राथमिक शिक्षणात शिशूंचे शिक्षण महत्वाचे आहे. तिथे खरे संस्कार दिले जाने गरजेचे आहे. कोरड्या ज्ञानापेक्षा संस्कार महत्वाचे ठरतात. तंत्रज्ञान, संशोधनात नाविण्यता येत आहे. त्या नाविण्यतेला असलेली गती अचंबित करणारी आहे. तो मार्ग देशाचे उत्पन्न वाढवणारा असल्याचे ते म्हणाले.

शहिद स्मारकाचे काम याच महिन्यात होईल सुरू
विद्यापीठ प्रवेशद्वाराच्या सुशोभिकरणाचा प्रकल्प विद्यापीठाने हाती घेतला आहे व तो येत्या दोन महिन्यात पुर्ण होईल. विद्यापीठ नामांतरासाठी शहीद झालेल्याचे ‘शहीद स्मारक’ बांधण्याचा प्रकल्पाचे काम याच महिन्यात सुरू होईल. असे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले प्रास्ताविकात म्हणाले. डॉ.अपर्णा अष्टपुत्रे व अर्पिता भुसारी यांनी सूत्रसंचालन केले.

‘डी.लिट’पेक्षाही पवार, गडकरींचे काम मोठे
त्याच्या २० मिनीटांच्या भाषणात शरद पवार आणि नितीन गडकरींची स्तूती करत या नेत्यांचे काम डि.लीट पेक्षाही मोठे आहे. दुसऱ्या वेळी या दोघांना डिलीट ने सन्मानित करतोय. आणखी दोन-तीन विद्यापीठाने त्यांनी डिलीट देण्याचा प्रस्ताव माझ्याकडे आलेले असल्याचे दोन्ही नेते व्हिजनरी असल्याचे सांगून त्यांच्या कामाबद्दल गौरोद्गार काढले.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, डॉ.वाल्मिक सरवदे, डॉ.प्रशांत अमृतकर, डॉ.चेतना सोनकांबळे, सहसंचालक डॉ.सतीश देशपांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.गणेश मंझा, प्रदीपकुमार जाधव यांची मंचावर उपस्थिती होती. या सोहळयास आ. हरिभाऊ बागडे, आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे, माजी खा. जयसिंगराव गायकवाड, माजी आ. मोहनराव साळुंके, माजी.आ. कैलास पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे आदींसह पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

उत्साह, शिस्त अन् नियोजन
सकाळी सात ते नऊ वाजेपर्यत पदवी प्रदान होणाऱ्या संशोधकांना स्कार्फ, बॅचचे वाटप करण्यात आले. सभागृहात बैठक व्यवस्थेचे त्या पद्धतीने नियोजन होते. पोलिसांच्या तगड्या बंदोबस्तात शिस्तबद्ध व सुत्रबध्द पध्दतीने हा सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पदवी प्रमाणपत्र स्विकारण्यासाठी एकच झुंबड पहायला मिळाली. सेल्फी, फोटो आणि दीक्षांत समारंभाच्या आठवणी मोबाईल, कॅमेरॅत कैद करण्यात संशोधक दंग होते. नाटयगृहाबाहेर मोठया पडद्यावर प्रक्षेपण करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावरुनही थेट प्रक्षेपण करण्यात आले. या समारंभानंतर विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर पदवी वाटप परिक्षाभवन येथे करण्यात आले.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University's 62nd Convocation: Nitin Gadkari, Sharad Pawar honored with D.Litt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.