कोरोना वाढल्याने दीक्षांत समारंभाबाबत विद्यापीठाची द्विधावस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 06:54 PM2021-03-27T18:54:08+5:302021-03-27T18:57:01+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत शासनाकडून काय मार्गदर्शक सूचना येतात, त्याकडे आमचे लक्ष आहे.
औरंगाबाद : दीक्षांत समारंभाबाबत विद्यापीठ प्रशासन द्विधावस्थेत आहे. एप्रिल अखेरपर्यंत हा समारंभ घेण्याचा विचार होता. त्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत प्रमुख पाहुण्यांची नावेही निश्चित झाली. काहींना त्यासंदर्भात उपस्थित राहाण्याविषयी कळविण्यातही आले आहे. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. तो कधी आटोक्यात येईल हे सांगता येत नाही. अशा परिस्थितीत दीक्षांत समारंभ घेण्याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे.
राज्यातील काही विद्यापीठांनी ऑनलाईन दीक्षांत समारंभ घेतले आहेत. मात्र, जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात जनजीवन सुरळीत झाले होते. त्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून औरंगाबादेत रोज हजाराहून अधिक रुग्ण सापडत आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन काय भूमिका घेते, त्यानुसार हा समारंभ ऑफलाईन घेता येईल की ऑनलाईन, यासंदर्भात पुढील निर्णय विद्यापीठ प्रशासन घेणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली. एप्रिलअखेर हा समारंभ घेण्याचा मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे. या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वैज्ञानिक तथा पद्मविभूषण रघुनाथ माशाळकर, परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर किंवा के. कस्तुरीरंगन या तीन पाहुण्यांची नावे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी जे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकतात, त्यांना निमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार परीक्षा विभागाने नुकतेच वैज्ञानिक रघुनाथ माशाळकर यांना या कार्यक्राला उपस्थित राहण्याबाबत पत्राद्वारे कल्पना दिली आहे. मात्र, त्यांच्याकडून अद्याप संमती मिळालेली नाही. तथापि, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले विद्यापीठात रुजू झाल्यानंतर सप्टेंबर २०१९ व फेब्रुवारी २०२० मध्ये दीक्षांत समारंभ घेण्यात आले. त्यानंतर आता घेण्यात येणारा त्यांच्या कार्यकाळातील तिसरा समारंभ होईल.
सध्या शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत शासनाकडून काय मार्गदर्शक सूचना येतात, त्याकडे आमचे लक्ष आहे. व्यवस्थापन परिषदेत एप्रिलअखेर दीक्षांत समारंभ घेण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार प्रमुख पाहुण्यांची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, सध्याच्या पार्श्वभूमीवर तो कधी व कसा आयोजित केला जाईल, हे तूर्तास सांगता येणार नाही, असे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांनी सांगितले.