अटीतटीच्या लढतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:30 PM2018-09-29T23:30:18+5:302018-09-29T23:31:25+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युवा महोत्सवाचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. सर्वोत्कृष्ट संघाचा ...

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University | अटीतटीच्या लढतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मारली बाजी

अटीतटीच्या लढतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मारली बाजी

googlenewsNext
ठळक मुद्देयुवा महोत्सवाची शानदार सांगता : देवगिरी महाविद्यालय आणि विद्यापीठ संघाला समान १९ पारितोषिके; विद्यापीठ ठरला सर्वोत्कृष्ट संघ

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या युवा महोत्सवाचा समारोप बक्षीस वितरणाने झाला. सर्वोत्कृष्ट संघाचा मान विद्यापीठ संघाने पटकावला. या संघाचा प्रतिस्पर्धी देवगिरी महाविद्यालयांच्या संघानेही नेटाने किल्ला लढवीत समान पारितोषिकांपर्यंत मजल मारली. मात्र, प्रथम क्रमांकाच्या सर्वाधिक पारितोषिकांमुळे विद्यापीठाने बाजी मारत तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट संघ म्हणून बहुमान पटकावला.
युवा महोत्सवाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे आणि अभिनेता संजय कुलकर्णी उपस्थित होते. प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा संचालक डॉ. जयश्री सूर्यवंशी, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. मुस्तजीब खान, संयोजन समितीचे सल्लागार प्रा. संभाजी भोसले, डॉ. दासू वैद्य, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. संजय नवले, डॉ. जयंत शेवतेकर, डॉ. संजय पाटील, डॉ. शिरीष आंबेकर आदी उपस्थित होते. पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर निकाल घोषित करण्यास सुरुवात झाली. विविध कला प्रकारांत तृतीय, द्वितीय अन् प्रथम पुरस्काराची घोषणा होताच ढोल-ताशांच्या गजरात कलावंत पुरस्कार स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर येत. टाळ्या, शिट्या, ढोलकी, संबळाचा गजर करीत त्याच्या तालावर नाचत येऊन पुरस्कार स्वीकारले जात होते. प्रत्येक निकालाच्या घोषणेची उत्कंठा लागून होती. कोड क्रमांक उच्चारताच एकच जल्लोष केला जाई, अशा प्रफुल्लित वातावरणात पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. निकालाचे वाचन प्रा. पराग हसे आणि डॉ. शिरीष पवार यांनी केले. दीपक पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी आभार मानले.
विद्यापीठ व देवगिरीत तुल्यबळ लढत
मागील तीन वर्षांपासून देवगिरी महाविद्यालय युवा महोत्सवाचे विजेतेपद पटकावत होते. त्यापूर्वी विद्यापीठाचे वर्चस्व होते. यावर्षी दोन्ही संघ विजेतेपद पटकावण्यासाठी जोरदार तयारी करीत होते. देवगिरीस वर्चस्व कायम ठेवायचे होते, तर विद्यापीठ गतवैभवाच्या शोधात होते. यात विद्यापीठ आणि देवगिरी महाविद्यालयाला ३७ कला प्रकारांत प्रत्येकी १६ पारितोषिके प्राप्त झाली. मात्र, यात विद्यापीठाला प्रथम क्रमांकाची ८, द्वितीय ३ आणि तृतीयची ५ होती, तर देवगिरीला प्रथम क्रमांकाची ६, द्वितीयची ३ आणि तृतीयची ७ पारितोषिके मिळाली. विद्यापीठ संघाने अधिकच्या प्रथम पारितोषिकांच्या आधारे बाजी मारली. गटाच्या पाच प्रकारांत दोन्ही संघांना समान दोन पारितोषिके मिळाली. कै. जगन्नाथराव नाडापुडे फिरता चषक देवगिरीने आणि उत्कृष्ट संघाचे पारितोषिक विद्यापीठाने पटकावले. यामुळे दोन्ही संघांना समान १९ पारितोषिके मिळाली आहेत.
शिवाजी महाविद्यालय ग्रामीणमध्ये सर्वोत्कृष्ट
ग्रामीण भागातील महाविद्यालयांतून कन्नड येथील शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने सर्वोत्कृष्ट संघाचा बहुमान पाचव्यांदा पटकावला आहे. या महाविद्यालयाने एकूण ४ पारितोषिके पटकावली.
पाच गटांत या संघांनी मारली बाजी
संगीत गट : विवेकानंद महाविद्यालय
नृत्य गट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
नाट्य गट : देवगिरी महाविद्यालय
ललित कला गट : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
लोककला गट : देवगिरी महाविद्यालय
स्वत:चा रस्ता स्वत: निवडा
आजची युवा पिढी पुढे गेली आहे. सगळ्यांना सगळे कळते. प्रगतीसाठी रस्ता योग्य निवडावा, असे आवाहन अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी केले. दुसऱ्याचे मार्गदर्शन घेण्यापेक्षा घरात असलेल्या आई-वडिलांचे मार्गदर्शन घ्या, त्यांच्यापेक्षा कोणीही चांगला मार्गदर्शक असूच शकत नाही, असेही त्यांनी सांगितले. माजी विद्यार्थी व अभिनेता संजय कुलकर्णी यांनी प्रत्येक महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभाग सुरू करण्याची मागणी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. अध्यक्षीय समारोप प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर यांनी केला. कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी प्रस्ताविक केले.
 

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.