डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मिळाले प्रकुलगुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 07:59 PM2018-02-24T19:59:15+5:302018-02-24T20:48:29+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अखेर पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्रकुलगुरू मिळाले आहेत. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची प्रकुलगुरूपदी निवड केली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला अखेर पाच महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर प्रकुलगुरू मिळाले आहेत. राज्यपाल तथा कुलपती सी. विद्यासागर राव यांनी देवगिरी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व जलतज्ज्ञ डॉ. अशोक तेजनकर यांची प्रकुलगुरूपदी निवड केली. याविषयीचे पत्र शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाले. दरम्यान, डॉ. तेजनकर हे सोमवारी (दि.२६) सकाळी ११ वाजता पदभार घेणार आहेत.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी प्रकुलगुरूपदासाठी डॉ. अशोक तेजनकर, विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सी. जे. हिवरे आणि लातुर येथील दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जोगिंदरसिंग बिसेन यांच्या नावाची शिफारस केली होती. राज्यपालांनी तिघांच्या मुलाखती २७ सप्टेंबर २०१७ रोजी राजभवनात घेतल्या. यानंतर दोन दिवसात नेमणूक होण्याची शक्यता होती. मात्र यासाठी तब्बल २३ फेब्रुवारीचा दिवस उजडला. तब्बल पाच महिन्यांच्या दिर्घ प्रतिक्षेनंतर विद्यापीठाचे पहिले प्रकुलगुरू म्हणून डॉ. अशोक तेजनकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
प्रशासन, संशोधनाचा दिर्घ अनुभव
डॉ. तेजनकर यांना शिक्षण, प्रशासन, भूगर्भ संशोधन क्षेत्रात २८ वर्षांचा अनुभव आहे. पाण्याच्या क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्प, भारत सरकारच्या स्किल इंडिया प्रकल्प, महाराष्ट्र-इस्राईल जलनियोजन समितीवर उल्लेखनीय कार्य केले आहे. याशिवाय तेजनकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ६२ संशोधन पेपर सादर केले आहेत. त्यांचे ९ ग्रंथ प्रकाशित आहेत.
‘दानवें’चा शब्द अंतिम
शैक्षणिक क्षेत्रातील नियुक्त्यांमध्येही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा शब्द अंतीम ठरत आहे. विद्यापीठाच्या प्रकुलगुरूपदाची नियुक्ती पाच महिन्यांपासून रखडली होती. यात दानवे यांनी हस्तक्षेप करत डॉ. तेजनकर यांच्या पारड्यात वजन टाकल्यामुळे नियुक्तीचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. यापूर्वी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी रावसाहेब दानवे यांचे बंधू जालना नगरपालिकेतील नगरसेवक भास्कर दानवे यांची कुलगुरू कोट्यातील अधिसभा सदस्यपदी नेमणूक केली आहे. यामुळे शैक्षणिक वर्तुळातही आता दानवे यांचा शब्द अंतिम ठरू लागल्याची चर्चा आहे.