डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ‘अ’ दर्जा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 08:31 PM2019-03-29T20:31:32+5:302019-03-29T20:33:06+5:30
‘नॅक’च्या गुणांकनात ‘सीजीपीए’ ३.०७ वरून ३.२२ वर पोहोचला
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बंगळुरू येथील राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषदेने (नॅक) केलेल्या मूल्यांकनानंतर ‘अ’ दर्जा कायम ठेवला आहे. २०१३ साली झालेल्या मूल्यांकनात विद्यापीठाला मिळालेला ‘सीजीपीए’ ३.०७ वरून ३.२२ वर पोहोचला आहे.
विद्यापीठाचे ‘नॅक’च्या सहा सदस्यीय समितीने २५ ते २७ मार्चदरम्यान तीन दिवस मूल्यांकन केले होते. यात समितीच्या सदस्यांनी पायाभूत सुविधांची पाहणी, विविध विभागांना भेटी, आजी-माजी विद्यार्थी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. २७ मार्च रोजी मूल्यांकन केल्याचा अहवाल बंद पाकिटामध्ये कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे आणि बंगळुरू येथील कार्यालयाला पाठविण्यात आला होता.
बंगळुरू येथे ‘नॅक’च्या उच्चस्तरीय कार्यकारिणीची बैठक झाली. यामध्ये देशभरात ‘नॅक’कडून मूल्यांकन करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थांचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला एकूण ७ विभागांत ३०६९ गुणांपैकी ९५२ गुण प्राप्त झाले आहे. या गुणांचा ‘सीजीपीए’ हा ३.२२ एवढा होत असल्यामुळे ‘अ’ दर्जा बहाल करण्यात येत असल्याचा ई-मेल ‘नॅक’कडून विद्यापीठ प्रशासनाला आला आहे. २०१३ मध्ये हाच ‘सीजीपीए’ ३.०७ एवढा होता. त्यामध्ये वाढ झाली आहे. यामुळे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संशोधनाला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान आणि राज्य शासनाकडून निधी मिळण्याचे दरवाजे उघडले आहेत.
‘नॅक’कडून मागील वर्षभरापासून मूल्यांकनाची पद्धत बदलण्यात आली आहे. मूल्यांकन अधिक पारदर्शकपणे होण्यासाठी ७० टक्के गुणांचा डाटा आॅनलाईन मागविण्यात येतो. हा मागविलेला डाटा त्रयस्थ संस्थेकडून तपासला जातो. विद्यार्थ्यांच्या फिडबॅकला ५ टक्के गुण दिले जातात. हा फिडबॅकही आॅनलाईनच दिला जातो. उर्वरित २५ टक्के गुणांसाठी विद्यापीठात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी समिती पाठविण्यात येते. या पद्धतीने राज्यात पहिल्यांदाच विद्यापीठाचे मूल्यांकन करण्यात आले आहे. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यशस्वी ठरले असून, पूर्वीचा दर्जा कायम ठेवतानाच ‘सीजीपीए’मध्ये ०.१५ ने वाढ मिळविली असल्याचे विद्यापीठाच्या ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी सांगितले. ०.४ ने गुण वाढले असते, तर विद्यापीठाला ‘अ प्लस’ दर्जा मिळाला असता, हे शल्य कायम राहील, असेही त्यांनी सांगितले.
‘आयक्वॅक’ संचालकांनी दिला राजीनामा
विद्यापीठाच्या ‘नॅक’ची संपूर्ण धुरा सहकाऱ्यांच्या मदतीने एकहाती सांभाळणारे ‘आयक्वॅक’चे संचालक डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी ‘नॅक’कडून दर्जा बहाल केल्याचे कळताच आपल्या पदाचा राजीनामा कुलगुरूंकडे पाठविला आहे. याविषयी त्यांना विचारले असता, ते म्हणाले, विद्यापीठाला असणारे घटनाकारांचे नाव आणि त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे दिलेली जबाबदारी अतिशय काटेकोरपणे पूर्ण केली. आता या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी राजीनामा दिल्याचे डॉ.शिरसाठ यांनी सांगितले. कुलगुरूंकडून सतत ‘नॅक’ कामाच्या निमित्ताने होणारा अपमान, मिळणारी वागणूक सहन केली. मात्र माझ्यासारखा स्वाभिमानी प्राध्यापक हा प्रकार जास्त काळ सहन करू शकत नाही, अशी भावना व्यक्त करून डॉ. शिरसाठ यांनी राजीनामा सोपविला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘आपलं’ विद्यापीठ ही भावना ठरली निर्णायक
विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मागील सहा महिन्यांपासून रात्रंदिवस काम केले. तीन महिन्यांपासून विद्यापीठातील प्रत्येक जण ‘आपलं विद्यापीठ’ म्हणून मेहनत घेत होता. अनेकांनी सुट्टीच्या दिवशीही ‘नॅक’च्या कामाला वाहून घेतले. यामुळेच पहिला ‘अ’ दर्जा टिकवता आला. त्यात अधिक गुणवत्तेची भरही पडली, अशी प्रतिक्रिया डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
विद्यापीठाला ‘ए प्लस’ दर्जा मिळायला पाहिजे होता. त्यादृष्टीनेच तयारी केली होती. हा दर्जा थोडक्यात हुकला. तरीही नवीन नियमानुसार ‘अ’ दर्जा टिकवला हेसुद्धा कौतुकास्पद आहे. विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी ‘आपलं विद्यापीठ’ या भावनेतून केलेल्या कामामुळे हे यश मिळाले आहे.
- डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू