डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला मिळाली २० हजार पुस्तकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 07:56 PM2018-02-16T19:56:02+5:302018-02-16T19:58:33+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला रायगड जिल्ह्यातील हिंदूस्थान आॅर्गेनिक केमिकल्स कंपनीने २० हजार पुस्तके भेट दिली आहेत.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाला रायगड जिल्ह्यातील हिंदूस्थान आॅर्गेनिक केमिकल्स कंपनीने २० हजार पुस्तके भेट दिली आहेत. अतिशय दुर्मिळ असा ठेवा असलेली ही पुस्तके शुक्रवारीच विद्यापीठात दाखल झाली. यात विज्ञान, पर्यावरण, संगणक, रसायनशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र विषयांच्या पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांच्या समावेशामुळे विद्यापीठाचे समृद्ध ग्रंथालय अधिक समृद्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यातील रसायनी येथे १९६२ साली स्थापन झालेल्या आॅर्गेनिक केमिकल्स ही रसायनशास्त्रातील नामांकित कंपनी आहे. रसायनशास्त्रासह विज्ञान, पर्यावरण, संगणक, वाणिज्य, व्यवस्थापनशास्त्र आदी विषयांमधील दुर्मिळ पुस्तके या कं पनीच्या संग्रहात होती. ही कंपनी स्थलांतरीत होणार असल्यामुळे कंपनीने त्यांचे सर्व ग्रंथालयच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला दिले आहे. या ग्रंथालयात तब्बल २० हजार पुस्तके आहेत. या पुस्तकांसोबतच असलेले फर्निचरही विद्यापीठाला दिले आहे. यातील काही पुस्तके विद्यापीठात दाखल झाली आहेत. तर उर्वरित पुस्तके आणि फर्निचर शनिवारी विद्यापीठात दाखल होणार असल्याचे ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितले. कंपनीने विद्यापीठाला भेट दिलेल्या पुस्तकांची किंमत ही ६९ लाख रूपये एवढी आहे. या दुर्मिळ पुस्तकांमुळे विद्यापीठाच्या समृद्ध ग्रंथालयाच्या समृद्धीत आणखी भर पडणार आहे. या पुस्तकांचा विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना विशेष फायदा होणार असल्याचे कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी स्पष्ट केले.
४५ हजार पुस्तकांमुळे ग्रंथालय बनले होते समृद्ध
हैदराबाद संस्थानात उद्योगमंत्री असलेले राजे शामराज राजरायन बहाद्दूर यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयाला तब्बल ४५ हजार पुस्तके भेट म्हणून दिले होते. यातील तब्बल ३ हजार ग्रंथ १६५० ते १८०० या कालखंडातील आहेत. या दुर्मिळ ग्रंथांची भर पडल्यामुळेच विद्यापीठाचे हे ग्रंथालय समृद्ध बनले होते. यानंतरही अनेकांनी ग्रंथालयाला पुस्तके भेट दिली आहेत. मात्र राजे शामराज यांच्यानंतर २० हजार ग्रंथ भेट देणारी हिंदुस्थान आॅर्गेनिक केमिकल्स ही दुसरीच कं पनी असल्याचे डॉ. धर्मराज वीर यांनी सांगितले.
सर्व पुस्तकांचे डिझिटलायझेशन केले जाणार
विद्यापीठाला भेट मिळालेल्या २० हजार पुस्तकांमधील अनेक पुस्तक ही आयएसओ स्टॅर्डडची आहेत. ही अतिशय दुर्मिळ पुस्तके असल्यामुळे बाजारात उपलब्ध नाहीत. या पुस्तकांचे जतन करण्यासाठी मार्च अखेरपर्यंत मिळालेल्या सर्व पुस्तकांचे डिझिटलायझेशन केले जाणार आहे.
- डॉ. धर्मराज वीर, ग्रंथपाल, विद्यापीठ