विद्यापीठात होणार ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना केंद्र’; मागासांना मिळेल आधुनिक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 12:33 PM2019-04-30T12:33:50+5:302019-04-30T12:38:36+5:30
तीन प्रकल्पाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) मंजुरी दिली आहे.
- राम शिनगारे
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा फायदा ग्रामीण भागातील नागरिकांना झाला पाहिजे, या हेतूने विद्यापीठाने दाखल केलेल्या तीन प्रकल्पाला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने (डीएसटी) मंजुरी दिली आहे. हे प्रकल्प तब्बल २ कोटी ६१ लाख ८६ हजार २०९ रुपयांचे असून, प्रकल्पांतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाच्या उत्थानासाठी ‘विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पना केंद्र’ स्थापन करून त्याद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात कन्नड तालुक्यातील सहा गावांची निवड करण्यात आली आहे.
विद्यापीठातील ‘डीडीयूकेके’चे संचालक डॉ. महेंद्र शिरसाठ आणि संगणकशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.भारती गवळी यांनी ‘डीएसटी’कडे मराठवाड्यातील अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील नागरिकांना माहिती तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र (इनोव्हेशन हब) स्थापन करण्यासाठी कोलकाता येथे तीन प्रकल्प सादर केले होते. या प्रकल्पाला नुकतीच डीएसटीने मान्यता दिली आहे. हे प्रकल्प २ कोटी ६१ लाख ८६ हजार २०९ रुपयांचे असून, पहिल्या टप्प्यात १ कोटी ४३ लाख १० हजार १२९ रुपये मंजूर केले आहेत.
या टप्प्यात कन्नड तालुक्यातील सहा गावांची निवड केली आहे. प्रत्येक वर्षी दोन गावांना वेगवेगळ्या तीन प्रकारात प्रशिक्षण दिले जाईल. पहिल्या वर्षी चिकलठाण आणि नागद, दुसऱ्या वर्षी नरसिंगपूर आणि देवगाव, तिसऱ्या वर्षी लोहगाव आणि अंधानेरचा समावेश असल्याची माहिती समन्वयक डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी दिली.
तीन प्रकल्पांना मंजुरी, तिघांचे सादरीकरण होणार
डीएसटीच्या कोलकाता येथील बैठकीत विद्यापीठातर्फे सहा प्रकल्प सादर करण्यात आले होते. यातील डीडीयूकेके, संगणकशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विभागांच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. याच वेळी प्राणीशास्त्राचे प्रा. डॉ. गुलाब खेडकर, डॉ. भालचंद्र वायकर आणि रसायन तंत्रज्ञान विभागाचे डॉ.भगवान साखळे यांचेही प्रकल्प सादर झाले होते. मात्र या तिन्ही प्रकल्पांत काही त्रुटी निघाल्यामुळे त्या दुरुस्त करण्याच्या सूचना डीएसटीने केल्या होत्या. या सूचनानुसार त्यात दुरुस्ती करून २४ मे रोजी विद्यापीठातच या तिन्ही प्रकल्पांचे सादरीकरण होणार असल्याचेही डॉ. महेंद्र शिरसाठ यांनी सांगितले.
हे तीन विभाग कार्य करणार
१. अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना तीन प्रकारात प्रशिक्षण दिले जाईल. यात पहिल्या प्रकारात ‘मानवी क्षमतांचा विकास आणि उपजीविकेसाठी ज्ञानवर्धन’ करण्यात येईल. यासाठी विद्यापीठातील दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र आणि रुसा सेंटर फॉर अॅडव्हान्सड् सेन्सर टेक्नॉलॉजी हा विभाग कार्य करील. यात डॉ. महेंद्र शिरसाठ यांच्यासह डॉ. कुणाल दत्ता, प्रा. विशाल उशीर, प्रा.अमोघ सांबरे, प्रा. रत्नदीप हिवराळे यांचा समावेश आहे.
२. दुसऱ्या प्रकारात नागरिकांना ‘संगणक कौशल्य प्रशिक्षण आणि त्यातील सुधारणा’ यावर मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागातील डॉ.भारती गवळी, डॉ. प्रवीण यन्नावार आणि डॉ. रमेश मंझा हे समन्वयक, सहसमन्वयक असतील.
३. तिसऱ्या प्रकारात ‘कृषी क्षेत्रातील बदल, सुधारणा आणि प्रशिक्षण’दिले जाईल. यासाठी वनस्पतीशास्त्र विभागाचे डॉ. अरविंद धाबे आणि देवगिरी महाविद्यालयाचे डॉ.किरण खरात हे समन्वयक आणि सहसमन्वयक असणार आहेत.