‘पीईएस’ अध्यक्षपदाच्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका: ज. वि. पवार
By विजय सरवदे | Published: April 22, 2023 07:27 PM2023-04-22T19:27:02+5:302023-04-22T19:27:51+5:30
बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.
छत्रपती संभाजीनगर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टाने पीपल्स एज्युकेशन सोसायटीची उभारणी केली. मात्र, आज या संस्थेचे अध्यक्षपद अनेक तुकड्यात विखुरले आहे. अध्यक्षपदाच्या ज्या खुर्चीत बाबासाहेब बसले होते, ती खुर्ची विखुरली जाऊ देऊ नका, तिचे पावित्र्य राखा, तेव्हाच मला दिलेल्या आजच्या या पुरस्काराचे चीज होईल, असे भावनिक आवाहन दलित पँथरचे संस्थापक सदस्य ज. वि. पवार यांनी आज येथे केले.
मिलिंद कला महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवारी, २१ एप्रिल रोजी ज. वि. पवार यांना सन २०२२-२३ या वर्षाच्या ‘मिलिंद सामाजिक कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मानपत्राचे वाचन उपप्राचार्य डॉ. संतोष बुरकुल यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना ज. वि. पवार म्हणाले, बाबासाहेबांनी समाजाला ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’, हा मूलमंत्र दिला. पीईएसच्या मुंबईतील सिद्धार्थ कॉलेज आणि या शहरातील मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजासाठी उच्चशिक्षणाची दारे खुली केली. मिलिंद महाविद्यालय आणि मराठवाड्यावर बाबासाहेबांचे विशेष प्रेम होते. समाजातील मुलं शिकली, तर महत्त्वाच्या पदावर विराजमान होऊन समाजाचे भले करतील, अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र, या प्रदेशातील मुलांनी ‘मिलिंद’चा पाहिजे तेवढा लाभ घेतला नाही. यापुढे समाजातील उच्चशिक्षित असलेला आणि समाजाच्या प्रश्नांसाठी संघटन वाढवून संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीला ‘पीईएस’च्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करावे.
बाबासाहेबांची ही संस्था सरकारने ताब्यात द्यावी, यासाठी १९७६ मध्ये काही मंडळींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. ते आम्ही हाणून पाडले. त्यानंतर अलीकडे पीईएसचे अध्यक्षपद अनेक तुकड्यात विखुरले गेले. मलाही एका तुकड्यावर बसविण्यासाठी विचारणा झाली होती. पण, मी नम्रपणे नकार दिला. बाबासाहेबांच्या या खुर्चीचे पावित्र्य राखण्यासाठी तिचे अनेक तुकड्यात विभागणी होणार नाही, याची दक्षता मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावी.
देश दुभंगण्याच्या वाटेवर
संविधानाच्या नावावर देश तोडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. संविधानाला विरोध आणि समर्थन, असे थेट दोन प्रवाह आहेत. तुम्ही समाजातील ‘क्रीम’ आहात. जास्तीत जास्त लाेकांना संविधानाची बाजू समजून सांगा. लोकांना संविधानाच्या बाजूने उभे करा आणि देश दुभंगणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन ज. वि. पवार यांनी केले.