विद्यापीठाने शैक्षणिक नियोजनासाठी नेमले ‘टास्क फोर्स’ : कुलगुरू येवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 07:38 PM2020-07-27T19:38:46+5:302020-07-27T19:41:05+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन बैठक झाली.
औरंगाबाद : ‘पोस्ट कोविड-१९’मुळे उच्च शिक्षणाचा पॅटर्न बदलावा लागणार असून, अध्यापन, मूल्यांकन यामध्ये मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. यासाठी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली ‘टास्क फोर्स’ची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी आॅनलाईन बैठक झाली. या बैठकीत आगामी वर्षभरात केलेल्या विविध उपाययोजनांबदल चर्चा करण्यात आली. आॅनलाईन शिक्षणासाठी प्रमाणे ‘ई-बामु पाठशाला’ हे वेबपोर्टल लवकरच विकसित करण्यात येणार आहे. या माध्यमातून कन्टेन्ट, आॅनलाईन लेक्चर्स, विविध विषयांवरचे व्हिडिओ विकसित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. कोरोना साथीच्या पार्श्वभमीवर साडेतीन महिन्यांपासून विद्यापीठ मुख्य परिसर व उस्मानाबाद उपपरिसर येथील शैक्षणिक व प्रशासकीय विभाग काही प्रमाणात बंद असले तरी वर्क फ्रॉम होम सुरू आहे.
आगामी काळात कोरोनानंतरचे शिक्षण खूप बदलणार आहे. टास्क फोर्सच्या नियमित बैठका घेण्यात येतील व महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावण्यात येतील. फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून कशा पद्धतीने अध्यापन, प्रात्यक्षिके, संशोधन, परीक्षा व मूल्यांकन करावयाचे, याबद्दलचा निर्णय या माध्यमातून घेण्यात येईल, असेही मा. कुलगुरू म्हणाले. विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन उच्चशिक्षण विभाग या सर्वांशी समन्वय ठेवून निर्णय प्रक्रिया राबविण्यात येईल. विद्यार्थ्यांची सुरक्षा व शैक्षणिक नुकसान होणार नाही ही बाब लक्षात घेऊनच ही संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बैठकीत प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्यासह टास्क फोर्सचे सर्व सदस्य सहभागी झाले.
‘व्हायरॉलॉजी’ विभागाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव
कोविड-१९ नंतर जिवाणू व विषाणूपासून होणारे विविध आजार व त्याचे संशोधन मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठाच्या वतीने ‘डिपार्टमेंट ऑफ व्हायरॉलॉजी’ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. लवकरच राज्य शासनाकडे सदर प्रस्ताव पाठविण्यात येईल. राज्य शासनाची मान्यता, तसेच आर्थिक निधी मंजूर होणे गरजेचे आहे, असेही कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले. कोरोना टेस्टिंंगसाठी दोन लॅब असणारे राज्यातील आपले पहिलेच विद्यापीठ ठरले आहे, असे ते म्हणाले.