स्वागतार्ह बदल! ६५ वर्षांत पूर्णवेळ १६ कुलगुरूंच्या विद्यापीठात प्रतिमा

By राम शिनगारे | Published: December 26, 2023 01:01 PM2023-12-26T13:01:38+5:302023-12-26T13:02:08+5:30

यादीच्या जागी आले छायाचित्र, विद्यमान कुलगुरू प्रमोद येवलेंचा  उपक्रम

Dr. BAMU News: A welcome change! Image of 16 full-time vice-chancellors in the BAMU university over 65 years | स्वागतार्ह बदल! ६५ वर्षांत पूर्णवेळ १६ कुलगुरूंच्या विद्यापीठात प्रतिमा

स्वागतार्ह बदल! ६५ वर्षांत पूर्णवेळ १६ कुलगुरूंच्या विद्यापीठात प्रतिमा

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठास स्थापनेपासून आजपर्यंत मिळालेल्या १६ पूर्णवेळ कुलगुरूंच्या प्रतिमा कुलगुरू दालनात दोन दिवसांपूर्वी लावण्यात आल्या आहेत. यापूर्वी कुलगुरूंच्या दालनात माजी कुलगुरूंच्या नावांची यादी लावण्यात आलेली होती; मात्र राज्यातील इतर विद्यापीठांमध्ये पूर्ण काम केलेल्या कुलगुरूंचे छायाचित्र लावलेले असल्यामुळे हा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

प्रत्येक आस्थापनेत मुख्य पदावर काम केलेल्या व्यक्तींच्या नावांची कार्यकालासह यादी व प्रतिमा मुख्य दालनात लावलेल्या असतात; मात्र विद्यापीठातील कुलगुरूंच्या दालनात केवळ यादी लावलेली होती. त्यामुळे कुलगुरू डॉ. येवले यांनी आस्थापना विभागाला आदेश देत २३ ऑगस्ट १९५८ पासून आजपर्यंतच्या पूर्णवेळ कुलगुरूंचे छायाचित्र दालनात लावण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले होते. त्यानुसार मागील ६५ वर्षांत विद्यापीठात १६ पूर्णवेळ कुलगुरू मिळाले आहेत. मिलिंद महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर. डोंगरकेरी यांना पहिले कुलगुरू होण्याचा बहुमान मिळाला. मराठवाडा विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी १४ जानेवारी १९९४ रोजी केला. त्यावेळी कुलगुरू डॉ.विठ्ठलराव घुगे हे होते तर डॉ. बी.ए.चोपडे हे १५ वे कुलगुरू होते. १६ वे कुलगुरू म्हणून डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होणार आहे. अनेक कुलगुरूंची छायाचित्रे ही अत्यंत छोट्या आकारात उपलब्ध होती. विद्यापीठाचे छायाचित्रकार पंकज बेडसे यांनी या सर्व छायाचित्रांचे संपादन केले. त्यानंतर १५ माजी कुलगुरूंच्या प्रतिमा दोन दिवसांपूर्वी विद्यापीठात लावण्यात आल्याचे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सांगितले.

ज्ञानी कुलगुरुंची परंपरा
विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या कुलगुरूंची परंपरा आपल्या विद्यापीठाला लाभली आहे. आजपर्यंत मला पाच विद्यापीठांच्या कुलगुरूपदी काम करण्याची संधी मिळाली. उर्वरित चारही विद्यापीठांमध्ये कुलगुरूंच्या नावासह कार्यकाळ व प्रतिमा लावलेले आहेत. त्यामुळे या विद्यापीठातही माजी कुलगुरूंच्या प्रतिमाही सन्मानपूर्वक कुलगुरू दालनात लावण्यात आल्या आहेत.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू

Web Title: Dr. BAMU News: A welcome change! Image of 16 full-time vice-chancellors in the BAMU university over 65 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.