विद्यापीठाला मिळणार प्रभारी कुलगुरू? 'टॉप फाईव्ह'मुलाखतीची तारीख नक्की ठरेना
By राम शिनगारे | Published: December 27, 2023 08:17 PM2023-12-27T20:17:14+5:302023-12-27T20:17:53+5:30
सध्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीचा पॅटर्ननुसार टॉप फाईव्हमधील उमेदवारांच्या नावावर खल सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नवीन कुलगुरू मिळण्याऐवजी १ जानेवारी रोजी प्रभारी कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे. राज्यपालकांकडे 'टॉप फाईव्ह' उमेदवारांच्या होणाऱ्या मुलाखतीची तारीख नक्की ठरलेली नाही. त्यामुळे येत्या सहा दिवसांत मुलाखती होऊन उमेदवार अंतिम होण्याची शक्यता दुरापास्त बनल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली.
विद्यापीठाच्या नव्या कुलगुरूंसाठी शोध समितीने २९ नोव्हेंबर रोजी आयआयटी मुंबईत २४ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. या मुलाखतींना २२ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील पाच जणांच्या नावाचा लिफाफा शोध समितीने २९ नोव्हेंबर रोजीच राजभवनाकडे सुपूर्द केला होता. त्यात पुणे विद्यापीठातील डॉ. विलास खरात, डॉ. संजय ढोले, कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील डॉ. ज्योती जाधव, डॉ. विजय फुलारी आणि नागपूर येथील डॉ. राजेंद्र काकडे यांच्या नावाचा समावेश होता. या 'टॉप फाईव्ह' जणांना राजभवनातुन मेलद्वारे १९ डिसेंबर रोजी मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आले होते.
मात्र, या मुलाखतीच्या एक दिवस आधीच संबंधित उमेदवारांना अपरिहार्य कारणास्तव मुलाखती स्थगित केल्या असून, नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल, असे सूचित केले होते. त्यास आता आठवडा उलटला आहे. तरीही नव्याने 'टॉप फाईव्ह'च्या मुलाखतींची तारीख अद्यापपर्यंत मिळालेली नाही. विद्यमान कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यास अवघे सहा दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उर्वरित सहा दिवसांमध्ये 'टॉप फाईव्ह' उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलावून त्यातून एकाची निवड करणे शक्य नसल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. त्यामुळे विद्यापीठास काही कालावधीसाठी प्रभारी कुलगुरू मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट आहे.
उमेदवारांवर सहमती होईना का?
सध्या राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या निवडीचा पॅटर्ननुसार टॉप फाईव्हमधील उमेदवारांच्या नावावर खल सुरू आहे. त्यात सत्ताधाऱ्यांच्या विचारसरणीचे बहुतांश उमेदवार नसल्यामुळे मुलाखती लांबणीवर पडत असल्याची चर्चाही उच्चशिक्षण क्षेत्रात सुरू झाली आहे. तसेच कोल्हापूरच्या एका उमेदवारासाठी ओबीसी समाजातील ज्येष्ठ मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.