पुढील वर्षात जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र पूर्ववत करण्याचे विद्यापीठाचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 05:11 PM2021-03-03T17:11:19+5:302021-03-03T17:14:08+5:30
Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabad गेल्या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये संपणाऱ्या परीक्षा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरू झाले.
औरंगाबाद : कोरोनामुळे संपूर्ण शिक्षणक्षेत्र विस्कळीत झाले आहे. मागील वर्षापासून परीक्षा लांबणीवर पडल्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष जून- जुलैऐवजी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये सुरू झाले. यापुढे वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करून दोन परीक्षांमधील कालावधी दोन-दोन महिन्यांनी कमी करायचा व जून- जुलै २०२२ पासून नवीन शैक्षणिक सत्र पूर्ववत सुरू करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.
गेल्या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये संपणाऱ्या परीक्षा ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आल्या. त्यामुळे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये सुरू झाले. परिणामी, ऑक्टोबर - नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी पदवी परीक्षा यंदा १ मार्चपासून, पदव्युत्तर परीक्षा एप्रिलमध्ये, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा मे महिन्यात घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या परीक्षा ऑगस्ट महिन्यात घेतल्या जातील. त्यानंतर साधारणपणे सप्टेंबर- ऑक्टोबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करायचे व जानेवारी २०२२ व मे २०२२ अखेरपर्यंत दोन्ही सत्रांच्या परीक्षा संपवून जून- जुलै २०२२ पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे विद्यापीठाचे नियोजन आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद परिसर व उस्मानाबाद उपपरिसरातील विभागप्रमुखांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. नवीन शैक्षणिक सत्रातील या पहिल्याच बैठकीत अभ्यासक्रम, तासिका, परीक्षा यासह विविध विषयांवर व्यापक चर्चा झाली. यावेळी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले, सरत्या वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जग विस्कळीत झाले. शिक्षण क्षेत्रालाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत ऑनलाईन, ऑफलाईन तासिका घेऊन अभ्यासक्रम संपवावा लागेल व एप्रिलअखेरपर्यंत परीक्षा पूर्ण कराव्यात, अशी सूचना केली. बैठकीचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. योगेश पाटील यांनी केले. व्यासपीठावर यावेळी अधिष्ठाता डॉ. वाल्मिक सरवदे, डॉ. भालचंद वायकर, डॉ. चेतना सोनकांबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सचिन देशमुख यांच्यासह ४८ विभागप्रमुख उपस्थित होते.
विभागांच्या स्वायत्ततेचा मुद्दा ऐरणीवर
आता ८०:२० पॅटर्ननुसार परीक्षा घेण्याची कुलगुरु डॉ. येवले यांनी सूचना केली. तेव्हा प्रात्याक्षिक परीक्षेचा मुद्दा चर्चेला आला. त्यावर कुलगुरुंनी विभागप्रमुखांना सांगितले की, विद्यापीठातील विभागप्रमुखांनी समिती स्थापन करून लेखी व प्रात्याक्षिक परीक्षेचे नियोजन करावे. कोरोनाचा संसर्ग वाढतच राहिला, तर प्रात्याक्षिक परीक्षा ऑनलाईन घेता येतील का, याचेही नियोजन या समितीने करावे. विद्यापीठातील विभागांना शैक्षणिक स्वायत्तता नाही, शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी ‘फ्लेक्झिबिलिटी’ देण्यात आलेली आहे. शैक्षणिक स्वायत्ततेसाठी ‘यूजीसी’कडे प्रस्ताव पाठवावा लागतो. प्रायोगिक तत्त्वावर काही विभागांना असे प्रस्ताव पाठवता येतील.