विद्यापीठाची ‘पेट-२’ ऑनलाइनच, परंतु परीक्षा केंद्रांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:57 AM2021-02-13T11:57:23+5:302021-02-13T11:58:41+5:30
पहिल्या पेपरमध्ये ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांन ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षा (पेट-२) ही ऑनलाइन; परंतु ती आता घरातून न देता विद्यार्थ्यांना केंद्रांवर जाऊन द्यावी लागेल. पेट - १ या परीक्षेस विद्यार्थी घरातून सामोरे गेले होते. यात अनेक गैर प्रकार झाल्याची चर्चा होती. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटचा सुद्धा फटका बसल्याचे पुढे आल्याने पेट - २ परीक्षा केंद्रावर घेण्याची मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती.
यापूर्वी ‘पेट- २’ ही ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांना घरूनच देता येईल, अशा सूचना ३० डिसेंबर रोजी जारी केल्या होत्या; मात्र आता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ही परीक्षा विद्यापीठाने निर्धारित केलेल्या परीक्षा केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर संगणक आणि इंटरनेट सुविधा पुरवण्यात येईल, अशा सुधारित सूचना जारी केल्या आहेत.
पहिल्या पेपरमध्ये ६ हजार ७७५ विद्यार्थ्यांन ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण
विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशपूर्व परीक्षेस (पेट) ४२ विषयांसाठी ११ हजार ७६८ जणांनी नोंदणी केली होती. यापैकी ११ हजार १५४ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. १ फेब्रुवारीस या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. ११ हजार १५४ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ६८८ जणांनी मराठीत, तर २८४ संशोधकांनी हिंदी भाषेत ही परीक्षा दिली, तर ५ हजार १८२ विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून पेपर दिला. यातील ११६ जणांना शून्य गुण मिळाले, तर ४ हजार २६३ विद्यार्थ्यांना १ ते ४४.५ टक्क्यांदरम्यान गुण प्राप्त झाले. ४५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ हजार ७७५ एवढी आहे.