डॉ. केळकर श्रद्धांजली
By Admin | Updated: September 21, 2014 00:38 IST2014-09-20T23:45:19+5:302014-09-21T00:38:59+5:30
डॉ. केळकर श्रद्धांजली

डॉ. केळकर श्रद्धांजली
डॉ. सुधीर रसाळ (ज्येष्ठ समीक्षक)
मराठी भाषाशास्त्र आणि समीक्षा या क्षेत्रात मूलभूत संशोधनपर लेखन करणारे डॉ. अशोक केळकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातील विद्वानांच्या पिढीतला शेवटचा दुवा निखळला. भाषाशास्त्र व इंग्रजी साहित्य या क्षेत्रातील त्यांचे कार्य जागतिक पातळीवर नावाजले गेले. त्यांनी निर्मोही वृत्तीने आयुष्यभर ज्ञानसाधना केली. त्यांचा ‘रुजुवात’ हा सैद्धांतिक समीक्षापर ग्रंथ मराठी साहित्य विश्वाला सतत मार्गदर्शन करीत राहील.
डॉ. प्रभाकर मांडे (लोकसाहित्याचे अभ्यासक)
भाषाविज्ञानाच्या क्षेत्रातील जागतिक ख्यातीचा माणूस आपण गमावला आहे. भारतात, विशेषत: महाराष्ट्रात आधुनिक भाषाविज्ञानाची पायाभरणी डॉ. केळकर यांनी केली. आजघडीला त्यांचे देशविदेशातील अनेक शिष्य भाषाविज्ञानाचा शास्त्रीय अभ्यास करीत आहेत. माझा व त्यांचा स्नेह गेल्या चार दशकांपासून होता. मला कायमच त्यांचे मार्गदर्शन लाभत असे. त्यांच्या निधनाने मी एक बंधुतुल्य स्नेही गमावला आहे.
डॉ. सतीश बडवे (मराठी विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ)
भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवर दबदबा असलेले केळकर यांचे कर्तृत्व होते. साहित्यसिद्धांत व चिन्हभाषाशास्त्र हे त्यांचे प्रमुख अभ्यासविषय होते. भाषेच्या अभ्यासकांची मराठीत वानवा असताना असा समर्पित संशोधक आपण गमावला आहे याचे दु:ख वाटते.
भाषाक्षेत्रातील संशोधन व चिकित्सात्मक लिखाणाला वाहिलेल्या ‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे संपादकपदही त्यांनी साक्षेपी वृत्तीने सांभाळले. ललित कला, साहित्यव्यवहार, साहित्य व मानवी जीवनाचा सहसंबंध अशा विषयांवर समग्र प्रकाश टाकणाऱ्या १९६४ ते २००५ या काळातील त्यांच्या लेखांचा संग्रह असणारा संदर्भग्रंथ ‘रुजुवात’ या शीर्षकाने प्रकाशित झाला. या ग्रंथासाठी त्यांना २०१० या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. यासह वैखरी, मध्यमा, त्रिवेणी, कवितेचे अध्यापन, मराठी भाषेचा आर्थिक संसार, भेदविलोपन : एक आकलन, प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा, फोनॉलॉजी अँड मॉर्फोलॉजी आॅफ मराठी व स्टडीज इन हिंदी उर्दू : इंट्रॉडक्शन अँड वर्ड फोनॉलॉजी (दोन्ही इंग्रजी) ही त्यांची महत्त्वाची ग्रंथसंपदा. याशिवाय वेळोवेळी त्यांचे दीडशेहून अधिक प्रासंगिक लेख, मुलाखती, संशोधनपर प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. मराठीसह हिंदी व इंग्रजीतून त्यांनी केलेल्या लिखाणाचाही विविध भारतीय व विदेशी भाषांतून अनुवाद केला गेला. त्याचप्रमाणे हिंदी, इंग्रजीसह तेलुगू, मल्याळम फ्रेंच, जर्मन अशा अनेकानेक भाषांतील मौलिक संशोधनही केळकर यांनी अनुवादरूपाने मराठीत आणले.
प्रा. ऋषिकेश कांबळे (साहित्यिक)
डॉ. केळकर यांच्या निधनाने आपण मराठी भाषेचा सव्यसाची संशोधक गमावला आहे. केळकर यांनी मराठी भाषेचे नेटके आकलन अभ्यासकांना करून दिले. भाषेच्या जन्म अपरिहार्यतेबरोबर भाषेच्या अवस्थांतराची त्यांनी केलेली मांडणी अतिशय शास्त्रशुद्ध ठरली. जगभरातील भाषांचे परस्परांशी असलेले सांस्कृतिक अनुबंध त्यांनी मूलगामी रूपात विशद केले. पाश्चात्त्य भाषांबरोबरच भारतीय भाषांचे त्यांनी केलेले निर्देशांकन प्रेरणादायी होते. विद्वत्तेबरोबरच त्यांच्या ठायी असलेले माणूसपण दीर्घकाळ मनात रुंजी घालत राहील.