'फिल्म तयार, रिलीज होणे बाकी'; पुराव्यासाठी पोलिसांनी एन २ येथील विहिरीवर ठाण मांडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 10:39 AM2021-10-18T10:39:16+5:302021-10-18T10:40:38+5:30
Dr. Rajan Shinde Murder Case : डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अतिशय बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत.
औरंगाबाद : प्रा. डॉ. राजन शिंदे यांच्या खून प्रकरणातील संशयित आरोपीला अटक करण्यासाठी शहर पोलिसांनी अगोदर ठोस पुरावे हस्तगत करण्यावर जोर दिला असल्याचे रविवारी दिसून आले. आरोपींनी हत्या केल्यानंतर शस्त्रे टाकलेल्या विहिरीवर शहरातील टॉपचे पोलीस अधिकारी दिवसभर ठांण मांडून होते. विहिरीतील पाणी उपसण्यात आले. पण सायंकाळ झाल्यामुळे गाळ काढण्यात अडचणी निर्माण झाल्या. यातच शनिवारी मध्यरात्री पाऊस झाल्यामुळे विहिरीतील पाणीसाठा वाढला. त्यामुळेही विलंब झाला असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
डॉ. शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अतिशय बारकाईने काही पुरावे गोळा केले आहेत. त्यासाठी विविध पथके तैनात केली होती. त्याची सुयोग्य मांडणी केली असून, विहिरीतून शस्त्र बाहेर काढल्यानंतर आरोपीच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. शनिवारी रात्रभर पाणी उपसण्यात येत होते. मध्यरात्रीनंतर पाऊस आल्यामुळे विहिरीतील पाणी उपसा करण्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. तसेच पाण्याचा उपसा झाल्यामुळेही विहिरीचे झरे रिकामे झाले. त्यामुळे विहिरीचा पाणीसाठा वाढला. रविवारी सकाळीच ७.४५ वाजताच तपासी अधिकारी निरीक्षक अविनाश आघाव यांनी पाणी उपसत असलेल्या विहिरीची पाहणी केली. तेव्हापासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ते गुन्हे शाखेच्या विविध अधिकाऱ्यांसह विहिरीवर बसूनच होते. पोलीस निरीक्षक गीता बागवडे, गौतम पातारे यांच्यासह उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनीही विहिरीची पाहणी केली.
पोलिसांच्या विविध पथकांनी डॉ. शिंदे यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात यश मिळवले आहे. त्यासाठी आवश्यक असलेले पुरावेही जमा केले. त्यानुसार आरोपीला सध्याच्या परिस्थितीत अटक केल्यानंतर तांत्रिक मुद्याच्या आधारावर तो एक दिवसात जामीन मिळू शकतो. हा धोका ओळखून आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटू नये, यासाठी पोलीस सज्जड पुरावे जमा करीत आहेत. पोलिसांनी तयार केलेल्या सर्व घटनाक्रमातील महत्त्वाचा धागा हत्येसाठी वापरलेले शस्त्र असून, ते मिळविण्यासाठीच ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका पोलिसांनी घेत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
अफवांचा बाजार वेगात
खुनाच्या अनुषंगाने समाजमाध्यमात विविध अफवा पसरविण्यात येत होत्या. संशयिताने एन २ येथील विहिरीत शस्त्र टाकल्याचा जबाब बदलला असून, एन ७ येथील विहिरीत शस्त्र टाकल्याचे नव्याने सांगितले, अशी अफवा रविवारी सकाळी पसरली होती. सगळीकडे फोनाफाेनी करण्यात येत होती; मात्र पोलिसांच्या सर्व पथकांनी एन २ येथील विहिरीच्या पाणी उपशावर लक्ष केंद्रित केले. तसेच एन ७ येथील विहिरीची अफवाच असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
फिल्म तयार, रिलीज होणे बाकी
डॉ. शिंदे यांचा खून कसा केला. कशामुळे केला. या खुनाच्या पूर्वी काही प्रयत्न झाले का. खून केल्यानंतर त्याची दिशा बदलण्यासाठी कोणत्या क्लुप्त्या केल्या, याची इत्यंभूत माहिती सुसूत्रीतपणे पोलिसांनी जोडली आहे. त्यासाठी लागणारे पुरावे, कागदोपत्री जबाब नोंदविण्यात आले आहेत. या खून प्रकरणाची पूर्ण फिल्म तयार झालेली असून, रिलीज होण्यासाठी विहिरीतून शस्त्र बाहेर काढण्याचाच अवकाश आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
...तर खटला ऐतिहासिक होणार
डॉ. शिंदे खून प्रकरणात पोलीस तपासामध्ये आतापर्यंत एकच संशयित निष्पन्न झालेला आहे. त्या संशयिताला कायद्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे. या संशयितांची सर्व कुंडलीच पोलिसांनी हस्तगत केली आहे. हा संशयित मागील अनेक महिन्यांपासून इंटरनेटवर काय सर्च करतो, वर्तवणूक कशी होती, शाळा, विद्यापीठातील त्याचे रेकॉर्ड काय आहे याची इत्यंभूत माहिती जमा करण्यात आली आहे. देशभर गाजलेल्या आणि कायद्याला आव्हान दिलेल्या दिल्लीतील निर्भया खटल्याप्रमाणे या खुनाच्या घटनेत क्रूरता भरलेली आहे. त्या दृष्टीने पोलीस तयारी करीत आहेत. विहिरीत शस्त्र मिळाल्यास खटला ऐतिहासिक होणार असल्याचा दावाही पोलीस अधिकाऱ्यांनी केला आहे.