पॅसेंजर गाडीचे डब्बे केले कमी
By Admin | Published: October 21, 2014 01:39 PM2014-10-21T13:39:50+5:302014-10-21T13:39:50+5:30
आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्या-जाणार्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली .
किनवट : आदिलाबाद-पूर्णा रेल्वे पॅसेंजरने येणार्या-जाणार्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केल्याने प्रवाशांना खचाखच भरून प्रवास करण्याची वेळ आली .
आदिलाबाद-पूर्णा पॅसेंजर गाडीने किनवट येथून नांदेड, आदिलाबादला जाणार्या प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. नांदेडहून किनवट येथे येण्यासाठी सायंकाळी एकच रेल्वे पॅसेंजर आहे. तर किनवटहून नांदेडला जाण्यासाठी पहाटे एकच गाडी आहे. या गाडीने जाणार्या-येणार्यांची संख्या अधिक आहे. आदिलाबाद-नांदेड मार्गावरील किनवट हे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेश्न आहे. सध्या दिवाळी सणाच्या तोंडावर येणार्या-जाणार्या प्रवाशांची संख्या वाढली असतानाच ऐन गर्दीच्या मोसमात रेल्वे विभागाने पॅसेंजर गाडीचे डब्बे कमी केले. सध्या या गाडीला सहाच डब्बे आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता डब्ब्यात बसणे कठीण बनले आहे. रेल्वे खचाखच भरून जात आहे.
डब्यातील सीटवर तर गर्दी असतेच पण प्रवाशांना आपले सामान ठेवण्यासाठी असलेल्या सीटवरही बसण्याची वेळ येत आहे. एवढेच नाही तर डब्ब्यात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. याचा त्रास महिला, बालकांना होत आहे. प्रवाशांची डब्ब्याच्या कमतरतेअभावी होणारी गैरसोय दूर करण्यासाठी किमान तीन डब्बे जादा जोडण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. /(वार्ताहर)