नालेसफाई घेणार महापालिकेची परीक्षा; आचारसंहितेनंतर निघणार साफसफाईची निविदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 08:05 PM2019-05-13T20:05:11+5:302019-05-13T20:06:08+5:30
जून महिन्यात कामाला सुरुवात होईल.
औरंगाबाद : मान्सूनपूर्वी दरवर्षी शहरातील नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर येतो. मागील वर्षी मनपाने कमी आणि पावसाने नालेसफाई जादा केली होती. यंदा अर्धा मे महिना संपत आला तरी महापालिकेने नालेसफाईसाठी निविदाही काढली नाही. २३ मे रोजी आचारसंहिता संपल्यावर निविदा काढण्यात येईल. त्यानंतर जून महिन्यात कामाला सुरुवात होईल.
महापालिकेतील काही मंडळींसाठी नालेसफाई अत्यंत आवडीचा विषय बनला आहे. दरवर्षी नालेसफाईचे काम एकाच व्यक्तीला देण्यात येते.
नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली होती. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला होता. यंदाही शहरातील ९ झोनसाठी तब्बल दोन कोटींच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे. दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते हे सर्वश्रुत आहे. मार्च, एप्रिलपासूनच तयारी करायला हवी. यंदा आचारसंहितेचे निमित्त सांगून तयारीला सुरुवात करण्यात आली नाही. दरवर्षी ज्या पद्धतीने नालेसफाई करायला हवी, त्या पद्धतीने होत नाही. नाल्याच्या दर्शनी भागातील फक्त केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो. दरवर्षी फक्त नालेसफाईचा देखावा करण्यात येतो. पावसाळा संपताच कोट्यवधींची बिले उचलण्यात येतात.
पावसाळ्यात निर्माण होणारे ‘डेंजर झोन’
दरवर्षी पावसाळ्यात गारखेडा परिसरातील शंभूनगर येथील नाल्याचे पाणी घरांमध्ये शिरते. गजानन महाराज मंदिर रोडवरील दिशा संकुल, गुरूकृपा हाऊसिंग सोसायटी, जयभवानीनगर, विष्णूनगर, छत्रपतीनगर, भानुदासनगर आदी कॉलन्यांमध्ये मोठ्या पावसामुळे हाहाकार उडतो. टाऊन हॉल, किराडपुरा, कटकटगेट, पोलीस कॉलनीजवळील वसाहती, जुनाबाजारमधील नाल्याशेजारील वसाहती, अशा अनेक भागांतील नागरिकांना पावसाच्या पाण्याचा फटका बसू शकतो.
कचऱ्याने नाले तुडुंब
शहरात मोठा पाऊस झाल्यास उथळ नाल्यामुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची अवस्था ‘मुंबई’ प्रमाणे होते.
शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.
इमारती, अतिक्रमणे
शहरातील विविध नाल्यांवर खाजगी संस्था, बँकांनी १५ ठिकाणी इमारती उभारल्या आहेत. याशिवाय अतिक्रमणेही शेकडोच्या संख्येने आहेत. ही अतिक्रमणे काढण्याची हिंमत प्रशासनाने कधीच दाखविली नाही. कारण यामागेही अनेकदा ‘राजकारण’आडवे येते. इमारत मालकांनीच त्यांच्या नाल्याखालील गाळ काढावा, अशी अट फक्त कागदावरच आहे. मात्र मागील काही वर्षात एकाही इमारत मालकाने नाला साफ केला नाही. त्यामुळे काही इमारतीखालून पाणी वाहणेच बंद झाले आहे. पावसाळ्यात दलालवाडी व पैठणगेट परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरते.
नाल्यांवरील जागांचा तपशील
संस्था, संघटना जागा
मराठा समाज सेवा मंडळ ३७२ चौरस मीटर
औषधी भवन ६८४ चौरस मीटर
सुराणा कॉम्प्लेक्स ३८०० चौरस मीटर
शिवाई ट्रस्ट १२२० चौरस मीटर
बॉम्बे मर्कंटाईल बँक ९०० चौरस मीटर
पीपल्स बँक, दलालवाडी ८२२ चौरस मीटर
सारस्वत बँक, नागेश्वरवाडी १०५३.९० चौरस मीटर
प्रेम सुराणा, पैठणगेट ३ हजार चौरस मीटर
मिर्झा मुस्तफा बेग, जाफरगेट २७९ चौरस मीटर