बजाजनगरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 10:22 PM2019-02-12T22:22:15+5:302019-02-12T22:22:50+5:30
वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्वावर सुरु करण्यात आलेले ड्रेनेजलाईनचे काम एमआयडीसी व कंत्राटदाराच्या वादात रखडले आहे. या प्रकल्पाचे ...
वाळूज महानगर : बजाजनगरातील बीओटी तत्वावर सुरु करण्यात आलेले ड्रेनेजलाईनचे काम एमआयडीसी व कंत्राटदाराच्या वादात रखडले आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण होत नसल्याने नागरी वसाहतीतील सेप्टिक टँक सतत चोकअप होत आहे. त्यामुळे दुर्गंधी व डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
बजाजनगरातील ड्रेनेज व सांडपाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एमआयडीसीने २०१३ मध्ये बीओटी तत्वावर ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात केली. जवळपास साडेबारा कोटी रुपये खर्चाचे या प्रकल्पाचे काम नवी मुंबई येथील भारत उद्योग लिमिटेड या एजन्सीला देण्यात आले. संबंधित संस्थेने हे काम उपठेकेदार नेमून ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरुवात केली. त्याने जवळपास ५० टक्के काम केले. मात्र या कामाचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने त्याने हे काम अर्ध्यावर सोडले.
लोकभावना व लोकप्रतिनिधी यांच्या विनंतीवरुन एमआयडीसीने या कामाची फेरनिविदा काढली. पण दिलेल्या मुदतीत एमआयडीसीने निविदा उघड केली नाही. ही निविदा प्रक्रिया पुढे ढक लून निविदा भरलेल्या ठेकेदारांना नव्याने निविदा भरण्याचे आवाहन केले. परंतू नवीन निविदेत जाचक अटी असल्याने संबंधित ठेकेदारांनी याकडे पाठ फिरविली. एमआयडीसीच्या या चालढकल धोरणामुळे पाच वर्षांनंतरही ड्रेनेजलाईनचे काम पूर्णत्वाकडे जाऊ शकलेले नाही. हा प्रकल्प पूर्ण होणार तरी कधी, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.