सातारा परिसरात अनेक ठिकाणी तुंबले ड्रेनेजचे सांडपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:04 AM2021-06-27T04:04:22+5:302021-06-27T04:04:22+5:30
औरंगाबाद : सातारा परिसरात ड्रेनेज लाइनची व्यवस्था नसल्याने मोकळ्या प्लॉटवर किंवा रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत असते. त्यामुळे सातारा परिसरातील ...
औरंगाबाद : सातारा परिसरात ड्रेनेज लाइनची व्यवस्था नसल्याने मोकळ्या प्लॉटवर किंवा रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत असते. त्यामुळे सातारा परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या तक्रारीला सामोरे जावे लागते.
सातारा- देवळाई परिसरात कोरोनाच्या काळात एका घराआड एका घरात कोरोनाने शिरकाव केल्याने स्वच्छतेसाठी नागरिकांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मनपाकडे तक्रारी केल्यास संबंधित एखाद्या कॉलनी व सोसायटीला नोटीस पाठवून सांडपाणी बाहेर येता कामा नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असे म्हटले जाते; परंतु कोणतीही कारवाई होत नाही. किंवा ड्रेनेजच्या घाण पाण्याचा बंदोबस्तही केला जात नाही. नागरिकांना स्वत:च्या खर्चातूनच सांडपाण्याचा बंदोबस्त करावा लागतो. औरा व्हिलेज परिसर, दीपनगर सातारा परिसर, एकतानगर मनपा कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजच्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.
चेंबर दाबून टाकले...
सिडकोकडे जमा असलेल्या साडे आठ कोटीच्या निधीतून मनपाने सातारा परिसरात रस्त्याची कामे केली आहेत. त्यात बहुतांश ठिकाणी जुने ग्रामपंचायतच्या काळातील चेंबर दाबून टाकल्याने ड्रेनेजचे सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. त्याकडे मनपाने लक्ष देण्याची गरज आहे. कायम स्वरूपी ड्रेनेज लाइन नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
- अशोक तिनगोटे (माजी ग्रामपंचायत सदस्य)
अखेर नागरिकांनी स्वत:च टाकला मुरूम
दीप नगर, साईसंस्कृती , डिलक्स पार्क परिसरातील नागरिकांनी मनपाकडे तक्रार करूनही त्यांनी दुरुस्तीविषयी नोटीस पाठविली; परंतु ड्रेनेज चोकपचे काम कोणीही केले नाही. अखेर नागरिकांनी मुरूम, माती आणून चिखलमय रस्त्यावर टाकला आहे. रस्ता सुरळीत झाला असला तरी सांडपाणी बंद झालेले नाही. अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
- डॉ. सतीश गोरे
शाळा बंद, परंतु घरी घाण पाण्यातून जावे लागते...
सातारा परिसरातील नागरिकांना प्रत्येक प्रश्नांसाठी संघर्ष करावाच लागतो. त्यानंतरही प्रश्न सुटत नाही, तत्कालीन महापाैर, आयुक्त, अधिकारी यांनी परिसरातील पाहणी केली; परंतु त्यावर तोडगा मात्र काढलेला नाही. असा सवाल राहुल देशपांडे, ए.जे.वाघमारे, विठ्ठल प्रसाद, मुळे, नीलेश काळे, गणेश खडके, गुंडेवार आदी नागरिकांनी उपस्थित केला आहे. (फोटो)