ड्रेनेजचे काम चार वर्षांपासून रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 06:23 PM2018-10-30T18:23:30+5:302018-10-30T18:27:25+5:30
वाळूज महानगर: बजाजनगरातील बीओटी तत्वावरील ड्रेनेजलाईनच्या कामाचे भिजत घोंगडे कायम असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता या योजनेचे काम करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून नव्याने निवीदा प्रकिया सुरु केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही योजना केव्हा कार्यान्वित होणार, असा सवाल रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.
वाळूज महानगर: बजाजनगरातील बीओटी तत्वावरील ड्रेनेजलाईनच्या कामाचे भिजत घोंगडे कायम असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. आता या योजनेचे काम करण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाकडून नव्याने निवीदा प्रकिया सुरु केली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ही योजना केव्हा कार्यान्वित होणार, असा सवाल रहिवाशांतून उपस्थित केला जात आहे.
जाजनगर या कामगार वसाहतीचा ड्रेनेजलाईनचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने सहा वर्षांपूर्वी बीओटी (बांधा, वापरा, हस्तांतरीत करा) तत्वावर जवळपास साडेबारा कोटी रुपये खर्चाच्या या योजनेचे काम हाती घेतले होते. या कामासाठी मुंबईच्या भारत उद्योग लि. या कंपनीची निवीदा मंजूर करण्यात आली होती.
या योजनेचे काम संबंधित भारत उद्योग कंपनीकडून सब-ठेकेदाराला देण्यात आले. दरम्यान, या कामावरुन मूळ ठेकेदार व सब ठेकेदार यांच्यात वाद निर्माण झाल्यामुळे या योजनेचे काम साधारणपणे चार वर्षांपूर्वी बंद पडले आहे. आजघडीला या योजनेंतर्गत बजाजनगरात पाईपलाईन टाकण्याचे काम जवळपास ७० टक्के पूर्ण झालेले असून, एसटीपीचे काम ३० ते ४० टक्क्यापर्यंत झाले आहे.
नियोजित वेळेत या योजनेचे काम पूर्ण न झाल्याने तसेच ठेकेदाराचा वाद न्यायालयात गेल्याने या योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहेत. अनेक नागरिकांनी सेफ्टी टँक सोसायटीच्या समोर उभारले आहे. मात्र, सेफ्टी टँक सतत चोक अप होत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांत वाद होण्याचे प्रकार घडतात. या परिसरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी एमआयडीसी प्रशासनाशी सतत पाठपुरावा करुन या योजनेचे काम सुरु करण्याची मागणी लावून धरली होती.
बजाजनगरातील ड्रेनेजचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एमआयडीसी प्रशासनाने नव्याने निविदा प्रकिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्यापपर्यंत निविदा प्रकिया पूर्ण न झाल्याने या योजनेचे काम सुरु झालेले नाही. निवीदा मंजूर होताच ड्रेनेजलाईनच्या कामाला सुरवात केली जाईल.
- भूषण हर्षे, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी