Video: विद्यापीठ युवक महोत्सवात प्रहसन बंद पाडले; धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
By योगेश पायघन | Published: October 18, 2022 07:41 PM2022-10-18T19:41:11+5:302022-10-18T20:10:36+5:30
विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील सहा कलावंत ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट रामायान डाॅट काम’ हे प्रहसन नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी सादरीकरण करत होते.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या युवक महोत्सवात सादर होणाऱ्या प्रहसनाने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करीत, तो प्रयोग केवळ दीड मिनिटात बंद पाडल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे वाद निर्माण झाला आहे. पटकथा पडताळणी समितीने ती पटकथा तपासलेली नाही का, याची चाैकशी करून दोषींवर कारवाईची मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांच्याकडे केली आहे.
विद्यापीठ नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील सहा कलावंत ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डाॅट रामायण डाॅट कॉम’ हे प्रहसन नाट्यगृहात सोमवारी सायंकाळी सादरीकरण करत होते. तोच दीड-दोन मिनिटात ते बंद पाडले. १० मिनिटांच्या स्क्रिप्टमधून सामाजिक संदेश द्यायचा होता. तो देता आला नाही. आम्हाला सादरीकरणाची संधी मिळाली पाहिजे. प्रहसनातून विडंबनात्मक मांडणी असते. प्रहसन आणि नाटकातील फरक समजून घ्यायला हवा, असे संघातील कलाकारांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्क्रिप्ट तपासल्या जात नाहीत का?
अभाविपचे नागेश गलांडे म्हणाले, विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने सादर केलेल्या प्रहसनात प्रभुराम, सीता, लक्ष्मण या देवीदेवतांचा अवमान केला. त्यामुळे तो प्रयोग बंद पाडला. त्यानंतर, डॉ. संजय संभाळकर यांच्यासमोर नाट्यशास्त्र विभागाच्या संघातील काहींनी माफीही मागितली. मात्र, आमच्या अस्मितेचा अवमान खपवून घेतला जाणार नाही. एवढ्यावरच हे थांबणार नाही. या स्क्रिप्ट तपासल्या जात नाहीत का? पडताळणी समितीने हे प्रोत्साहन दिले का? याची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी कुलगुरूंकडे केली आहे.
दहशत खपवून घेणार नाही
रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनीही कुलगुरूंना दिले. निवेदनात विद्यापीठ शिक्षणाचे केंद्र असून, धर्माच्या नावाखाली दहशत खपवून घेणार नसून, उत्सवात विरजण टाकणाऱ्यांना महोत्सवापासून दूर ठेवा, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर गुणरत्न सोनवणे, कुणाल भालेराव, अॅड.अतुल कांबळे यांच्याही स्वाक्षऱ्या आहेत.
अर्धवट पाहून चुकीचा अर्थ लावला
या प्रहसनाला यापूर्वी अनेक पारितोषिके मिळालेली असल्याने यातील काही भाग काढून ती मांडणी केली होती. ऐनवेळी नवख्या विद्यार्थ्यांनी ओव्हर ॲक्टिंग केली. या प्रहसनातून देव, धर्मांच्या राजकारणापेक्षा जिवंत प्रश्नांवर भांडले पाहिजे, असा संदेश देण्याचा प्रयत्न होता. मात्र, अर्धवट पाहून त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे, असे करू नका हे सांगणारा तो प्रसंग नाटकातील ‘नाटका’चा आहे. त्यातून कुणाचाही अवमान करण्याचा हेतू नाही. तरी दिग्दर्शक महिला शिक्षिका आणि संघप्रमुख म्हणून मीही माफी मागितली आहे.
- डाॅ. अशोक बंडगर, संघप्रमुख, नाट्यशास्त्र विभाग