विद्यापीठ सिनेट निवडणूक; १० जागांसाठी मतमोजणी सुरु, ३६ ते ४८ तास लागणार निकालास
By योगेश पायघन | Published: November 28, 2022 12:31 PM2022-11-28T12:31:59+5:302022-11-28T12:32:33+5:30
अधिसभेच्या १० जागांसाठी ५३ उमेदवारांचा होणार फैसला
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटातील १० जागांसाठी मतमोजणी ला सकाळी दहा वाजता क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात कुलसचिव डॉ भगवान साखळे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. सुरुवातीचे दोन तास मतपत्रिका वर्गीकरणाची प्रक्रिया चालणार आहे. त्यानंतर कोटा निश्चिती होऊन दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होईल.
सिनेट निवडणुकीसाठी शनिवारी रिंगणात असलेल्या ५३ उमेदवारांसाठी ३६ हजार २५४ पैकी केवळ १८ हजार ४०० (५०.७५ टक्के) पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. क्रीडा विभागातील बॅडमिंटन सभागृहात सोमवारी सकाळी १० वाजता कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. दोन उमेदवारांना स्ट्रॉंग रूम दाखवून मतपेट्या बाहेर आणण्यात आल्या. त्यानंतर प्रतिनिधींसमोर मतपेट्या उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतमोजणी प्रक्रिया सलग ३२ ते ४८ तास चालण्याची शक्यता आहे. निवडणुकीचे अपडेट संकेतस्थळावर उपलब्ध असतील; तसेच मतमोजणी केंद्राबाहेर ‘स्क्रीन’वर पाहता येणार आहे. मतमोजणी प्रतिनिधी उमेदवार, समर्थक मतमोजणी परिसरात जमायला सुरुवात झाली आहे.
मतमोजणीसाठी प्रत्येक सत्रात ४० प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी असे एकूण १२० जण नेमण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. मतमोजणी प्रक्रियेला तारांनी बंदिस्त करण्यात आले असून, १६ कॅमेरे लावण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी कंट्रोलरूमची स्थापना करण्यात आली असुन तगडा पोलीस बंदोबस्त आहे.
दहा जागांसाठी असे झाले मतदान
जिल्हा -मतदार -मतदान -टक्के
औरंगाबाद -१७,४३६--८,३८६--४८.४९
बीड -१२,३७०-६,७३७ -५४.४६
जालना -३,९४७-१,८७९ -४७.६०
उस्मानाबाद -२,५०१ -१,३९८ -५५.५३
एकूण -३६,२५४ -१८,४०० -५०.७५
पुरुष -२८,४६१ -१५,१७५ -५३.३१
महिला -७,७९३ -३,२२५ -४१.३८