विद्यापीठ सिनेट निवडणूक: विद्यार्थी नेत्यांनी केला दिग्गजांच्या विजयाचा मार्ग खडतर
By योगेश पायघन | Published: December 2, 2022 07:49 PM2022-12-02T19:49:12+5:302022-12-02T19:51:45+5:30
१० पैकी तिघे पहिल्यांदाच झाले सदस्य
- योगेश पायघन
औरंगाबाद : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा पदवीधर गटाची निवडणूक चुरशीची झाली. नाराजी संभाळण्यासाठी विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने पदवीधरसाठी खुल्या प्रवर्गातून दिलेल्या ८ उमेदवारांमुळे एक जागा गमवावी लागली. केवळ दोघांनाच कोटा पूर्ण करता आला. विजयी दत्तात्रय भांगे, पूनम पाटील यांचा अपवाद वगळता विद्यार्थी संघटनेत सक्रिय उमेदवारांना विजय मिळवता आला नसला तरी दिग्गजांच्या विजयाचा प्रवास मात्र, त्यांनी खडतर केला. त्यामुळे ३ उमेदवारांना कोटा पूर्ण करता न आल्याने २४ व्या फेरीनंतर काठावर पास होऊन विजयाचे समाधान मानावे लागले.
खुल्या गटात डॉ. नरेंद्र काळे १२ व्या फेरीत, तर जहूर शेख खालेद १८ व्या फेरीत कोटा पूर्ण करून विजयी झाले. भारत खैरनार २ हजार ६७६ मते मिळवून दुसऱ्यांदा विजयी झाले. हरिदास सोमवंशी १ हजार ७२७ मिळवून पहिल्यांदा अधिसभेत पोहोचले. योगिता होके पाटील २ हजार १७३ मिळविली. उत्कर्षकडून मदतीची चर्चा असताना विद्यापीठ विकास मंचने दिलेले खुल्या गटातील चारच उमेदवार व ट्रान्सफर झालेली मतांचा नियोजनाने होके पाटील यांच्या विजयाचे कारण बनले. पंडित तुपे मागे पडले मात्र, शेवटपर्यंत झुंज दिलेले संभाजी भोसले व रमेश भुतेकर या गेल्यावेळच्या सदस्यांचेही मते ट्रान्स्फर करण्याचे नियोजन हुकल्याने पराभवाला सामोरे जावे लागले. सुभाष राऊत यांनी ९,४३३ मते घेत मताधिक्याचा विक्रम केला. सुनील मगरे ८ हजार ९३६, सुनील निकम ८ हजार ५१ मते मिळवून पुन्हा सिनेटचे सदस्य झाले.
अधिसभेच्या पदवीधर निवडणूकीत अ.भा.वि.प., वंचित बहुजन आघाडी, युवासेनेने विद्यार्थी नेत्यांना संधी दिली. उत्कर्षकडून लढलेल्या युवासेनेच्या पूनम पाटील यांना ८ हजार २, दत्तात्रय भांगे ७ हजार २२६ मते घेत विद्यार्थी चळवळीतून सभागृहात पोहोचण्याचा मान मिळवला. निवडणुकीने विद्यापीठात सक्रिय विद्यापीठ चळवळीत नेत्यांना पुन्हा एकदा आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे. या नेत्यांनी दिग्गजांना आव्हान दिले मात्र, मतदान करून घेण्यात कमी पडल्याने पुन्हा एकदा संधी हुकली आहे.
विद्यार्थी केंद्री नसलेली पदवीधर निवडणूक
साडेतीन लाखांपेक्षा अधिक पदवीधर पदवी घेऊन दरवर्षी विद्यापीठातून बाहेर पडत असताना मतदार नोंदणीत अवघे ३५-३५ हजारांचा सहभाग. त्यातही नोकरदार, संस्थांशी संबंधित लोकांची संख्या ८० टक्क्यांपेक्षा अधिक दिसून आली. नोंदणी व मतदानात यातील तफावत आणि २५ टक्के बाद मते यावरून ही निवडणूक विद्यार्थीकेंद्री होत नसल्याचे चित्र समोर आले. मतदानातही विद्यार्थ्यांची संख्या तुरळकच होती.
नाराजी सांभाळण्यात एक जागा गेली...
आ. सतीश चव्हाण यांनी उत्कर्षच्या विजयातून पहिल्या टप्प्यात वर्चस्व सिद्ध केले असले तरी उमेदवारांची नाराजी सांभाळण्यात त्यांनी एक जागा गमावल्याची चर्चा आहे. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत उत्कर्ष, परिवर्तन, विद्यापीठ विकास मंच, विद्यापीठ विकास आघाडी मैदान असून, प्रचाराला रंग चढायला सुरुवात झाली आहे.