विद्यापीठाची डिजिटल भरारी; लवकरच १० लाख पदव्या होणार ‘डिजी लॉकर’मध्ये जमा
By विजय सरवदे | Published: May 20, 2023 06:55 PM2023-05-20T18:55:13+5:302023-05-20T18:58:05+5:30
आगामी काळात कागदपत्रे सुरक्षित राहतील व ती सोबत बाळगण्याची गरजही राहणार नाही.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी ‘डिजी लॉकर’ची सुविधा देण्याची योजना हाती घेतली आहे. त्यामुळे आता महत्त्वाची कागदपत्रे सोबत बाळगणे किंवा नोकरीसाठी सातासमुद्रापार जरी गेलात, तरी कागदपत्रांचे व्हेरिफिकेशन करण्याची चिंता मिटणार आहे. अलीकडच्या दहा वर्षांतील सुमारे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून, आतापर्यंत दोन लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पदव्या या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात विद्यापीठ सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र शासनाच्या उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत ‘नॅशलन अकॅडमिक डिपॉझिटरी’ स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत देशातील सर्व विद्यापीठे, स्वायत्त संस्थांमधील विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे, गुणपत्रिका ऑनलाइन उपलब्ध असणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या उपक्रमांतर्गत ‘डिजी लॉकर’ हे पोर्टल सुरू करण्यासाठी आग्रही भूमिका घेतली. त्यानुसार सध्या सन २०१२ ते २०२२ या दहा वर्षांतील पदवीधरांच्या पदव्या ‘डिजी लॉकर’मध्ये अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा वर्षांतील सुमारे दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्रे या लॉकरमध्ये अपलोड करण्याचा निर्धार कुलगुरू डॉ. येवले यांनी केला आहे. आतापर्यंत दोन लाख १८ हजार विद्यार्थ्यांच्या पदव्या अपलोड झाल्या आहेत.
... अन्यथा निकाल रोखले जातील
महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेनंतर ‘एमकेसीएल’च्या संकेतस्थळावर माहिती भरताना विद्यार्थ्यांचा अचूक मोबाइल क्रमांक व ईमेलची नोंद करावी. अलीकडे सर्व विद्यार्थ्यांच्या नावापुढे एकच मोबाइल क्रमांक भरलेला दिसत आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्राची माहिती पोर्टलमध्ये अपलोड करता येत नाही. विद्यापीठाचे परीक्षा अर्ज हे संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास सादर करण्यात येतात. त्यामुळे ही सर्व जबाबदारी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची आहे. प्राचार्यांनी त्वरित कार्यवाही करून सात दिवसांच्या आत कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. अन्यथा आपल्या महाविद्यालयाचे निकाल घोषित करण्यात येणार नाहीत, असा इशारा परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. भारती गवळी यांनी दिला आहे.
आगामी काळात गुणपत्रिकांचीही सुविधा
देश-विदेशात नोकरीस लागलेल्या तरुणांची कागदपत्रे ‘व्हेरिफिकेशन’साठी विद्यापीठाकडे पाठविण्यात येतात. आता ‘डिजी लॉकर’च्या माध्यमातून ‘ऑनलाइन व्हेरिफिकेशन’ सुलभ होऊ शकते. विशेष म्हणजे, आगामी काळात कागदपत्रे सुरक्षित राहतील व ती सोबत बाळगण्याची गरजही राहणार नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांनी आपली नैतिक जबाबदारी लक्षात घेऊन वेळेत डाटा पाठवावा. यापुढे पदवीसोबतच गुणपत्रिका देखील या लॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
- डॉ. प्रमोद येवले, कुलगुरू