हरीत गोलवाडी टेकडीचे स्वप्न भंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 07:29 PM2018-12-25T19:29:42+5:302018-12-25T19:29:57+5:30
वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी ...
वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धन व संतुलन राखण्यासाठी हरित सिडको मोहिमेंतर्गत सिडको प्रशासन व उद्योजक यांनी सहा महिन्यांपूर्वी गोलवाडी टेकडीचा विकास करुन हिरवीगार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अद्याप पाऊले उचलण्यात न हरीत टेकडीचे स्वप्न हवेत विरल्याचे दिसते. सध्या पर्यटकांचे आकर्षण असलेली टेकडी भकास झाल्याने ग्रामस्थांसह पर्यावरण प्रेमीमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
औरंगाबाद-नगर महामार्गालगत असलेली गोलवाडी टेकडी वाळूज महानगरातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखली जाते. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने सिडको प्रशासनाने टेकडीचा विकास करुन वृक्षलागवडही केली होती. पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टेकडीची दुरावस्था झाली. दरम्यान, येथे मद्यपी व टवाळखोरांचा वावर वाढल्याने नागरिकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्योजकांच्या मदतीने टेकडीचा विकास करण्याचा निर्णय घेतला. मासिआ व बजाज अॅटो कंपनीनेही या टेकडीच्या विकासाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या अनुषंगाने सिडको प्रशासन, मासिआ व बजाज अॅटो यांनी संयुक्तरित्या १४ जून रोजी गोलवाडी येथे ग्रामस्थांसोबत बैठक घेतली. बैठकीत पर्यटनाच्या दृष्टिने सर्वागीन विकास करुन टेकडीवर विविध प्रकारची झाडे लावून टेकडी हिरवीगार करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात विकास कामाचा शुभारंभ करण्याचेही ठरले होते. यात मासिआ व बजाज यांनी झाडे लावण्याची तर सिडकोने संपूर्ण झाडांना तारेचे कुंपन करुन ठिबकद्वारे पाणी देण्याची जबाबदारी स्विकारली होती. याच बरोबर गोलवाडी ग्रामस्थांवर संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
दरम्यान, टेकडीच्या विकासाकडे कोणीही लक्ष दिले नाही. त्यामुळे टेकडीची भकास अवस्था झाली आहे. प्रशासनासह उद्योजकांना आपल्याच निर्णयाचा विसर पडल्याने गोलवाडी टेकडी हिरवीगार करण्याचे स्वप्न हवेत विरले आहे. यासंदर्भात सिडकोचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.
टेकडी झाली भकास ..
गोलवाडी टेकडीवरील नवीन वृक्षलागवड झाली तरच नाहीच पूर्वीची वृक्षेही जळून गेली आहेत. टेकडी एका बाजूने तर अर्ध्यापेक्षा अधिक टेकडीचा भाग जळालेला आहे. पायऱ्या मोडकळीस आल्या असून, काही ठिकाणी तुटल्या आहेत. झाडांसाठी काही ठिकाणी बसविलेले ठिबकचे पाईप तुटले आहेत. गेटचीही दुरावस्था झाली आहे. झाडा अभावी टेकडी भकास दिसत आहे.
मुलभूत सुविधांशिवाय विकास अशक्य
टेकडीवर संरक्षक भिंतीचे काम अद्याप झाले नाही. पाण्याची सोय नाही. अनेकवेळा झाडे लावल्यानंतर जनावरामुळे झाडे नष्ट होत आहेत. शिवाय यंदा पाऊसही कमी होता. लावलेली झाडे वाळून जातील म्हणून काम स्थगित करण्यात आले आहे. या पावसाळ्यात हे काम हाती घ्यावे लागेल. उद्योजकांना टेकडीचा विकास करावयाचा आहे. पण त्या ठिकाणी मुलभूत सुविधा झाल्याशिवाय विकास करणे शक्य नाही. असे मासिआचे माजी अध्यक्ष सुनिल किर्दत यांनी लोकमतशी बोलतना सांगितले.
वृक्ष लागवडीसाठी श्रमदानाची व वृक्ष संरक्षणाची जबाबदारी घेतली. या संदर्भात प्रशासन व उद्योजक यांच्याशी दोनवेळा बोलणी झाली. पण त्यांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने टेकडी हिरवीगार करण्याचे स्वप्न हवेत विरल्याची खंत गोलवाडीच्या सरपंच मनिषा बाबासाहेब धोंडरे यांनी व्यक्त केली.