शिक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण! पदस्थापना मिळताच अनेकांच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू
By राम शिनगारे | Published: March 14, 2024 02:51 PM2024-03-14T14:51:29+5:302024-03-14T14:51:29+5:30
शिक्षक भरती : ३६३ पैकी २२७ जणांची मिळाली गावे, उर्वरित शिक्षकांना १६ मार्चला मिळणार
छत्रपती संभाजीनगर : मागील अनेक वर्षांपासून शिक्षक होण्याचे पाहिलेले अनेकांचे स्वप्न बुधवारी पूर्ण झाले. जि. प. सभागृहात निवड झालेल्या ३६३ पैकी २२७ जणांना प्रत्यक्ष पदस्थापना देण्यात आली. उर्वरित उमेदवारांना १६ मार्चला पदस्थापना देण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली. पदस्थापना घेऊन सभागृहाबाहेर आल्यानंतर अनेक उमेदवारांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळल्याचेही पाहायला मिळाले.
तब्बल दहा वर्षांनंतर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीसाठी पात्र ठरलेल्या ३६३ उमेदवारांना पदस्थापना देण्यासाठी बुधवारी कागदपत्रांसह बोलावण्यात आले होते. जि.प.च्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या नेतृत्वात सकाळपासूनच प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यात मराठी माध्यम पदवीधर प्राथमिक शिक्षकातील १९७, उर्दू माध्यम पदवीधर प्राथमिक शिक्षक १६ आणि उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक १४ अशा २२७ जणांना पहिल्याच दिवशी पदस्थापना देण्यात आली आहे. पदस्थापना देण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये सहावी ते आठवीपर्यंतच्या पदवीधर शिक्षकांचा समावेश आहे. पहिली ते पाचवीच्या उमेदवारांना १६ मार्चला येण्यास सांगितले. त्यामुळे उन्हात बसलेल्या उमेदवारांनी चांगलाच संताप व्यक्त केला. आम्ही इतक्या लांबून आलो. आजच प्रक्रिया का नाही, असा सवाल उपस्थित उमेदवारांनी केला. मोठ्या आशेने आलो, पण हिरमोड झाल्याचे नव्या उमेदवारांच्या चेहऱ्यावर दिसून आले. दरम्यान, नव्याने नियुक्ती होत असतानाही ‘सर आम्हाला जवळचे गाव द्या, छत्रपती संभाजीनगरच द्या’ अशी मागणी उमेदवार करीत होते. पदस्थापना देण्याच्या प्रक्रियेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन तुपे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, उपशिक्षणाधिकारी नीता श्रीश्रीमाळ, गीता तांदळे, अधीक्षक सचिन शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी लईक सोपी, संगीता सावळे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी प्रदीप राठोड, रवींद्र देवडे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत दीक्षित, रवींद्र संगवी, कृष्णा शिंदे, आदींचा समावेश होता.
जेवणासह सेल्फीची उत्तम सोय
निवड झालेले उमेदवार राज्याच्या कोनाकोपऱ्यांतून नातेवाइकांसह आले होते. त्यासोबत महिलासोबत लहान मुलेही होती. त्यामुळे जि. प. प्रशासनाने परिसरात मंडपासह जेवणाचीही उत्तम सोय केली होती. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना सेल्फी घेण्यासाठी सेल्फी पॉईंटही बनविण्यात आला होता.
संघटनांचा बदल्यांसाठी दबाव
जिल्हा परिषदेच्या प्रशासनावर नव्या शिक्षकांना पदस्थापना देण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांच्या बदल्या करण्याचा प्रचंड दबाव होता. आंतरजिल्हा बदली, विनंती बदलीची मागणी असलेल्यांचा अगोदर विचार करावा, अशी मागणीच विविध संघटनांनी केली. त्यामुळे जि. प. प्रशासनाने ३६३ पैकी केवळ २२७ जणांनाच पदस्थापना दिली. उर्वरित शिक्षकांना १६ मार्चला देण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वीच कार्यरत शिक्षकांच्या बदल्या केल्या जाणार आहे. त्यासाठी शिक्षक संघटनांची बैठकही बुधवारी सायंकाळी शिक्षण विभागाने घेतली आहे.