स्वप्निल मानेंचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:02 AM2021-07-16T04:02:27+5:302021-07-16T04:02:27+5:30
खात्यांतर्गत चौकशी होणार : निलंबनाचे आदेश येईपर्यंत करणार जप्त वाहनांचा लिलाव औरंगाबाद : लाचप्रकरणी एक दिवसाच्या कोठडीत राहिलेले सहायक ...
खात्यांतर्गत चौकशी होणार : निलंबनाचे आदेश येईपर्यंत करणार जप्त वाहनांचा लिलाव
औरंगाबाद : लाचप्रकरणी एक दिवसाच्या कोठडीत राहिलेले सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल माने यांच्याकडील लायसन्स विभागाचा पदभार काढून घेण्यात आला आहे. निलंबनाचे आदेश येईपर्यंत त्यांच्याकडे जप्त वाहनांच्या लिलावाची जबाबदारी देण्यात आली आहे.
स्वप्निल माने आणि एका व्यक्तीला लाचप्रकरणी अटक करण्यात आली. दोघांनाही एक दिवसाची कोठडी मिळाली. जामीन मिळाल्यानंतर स्वप्निल माने कार्यालयात हजर झाले आहेत. स्वप्निल माने यांच्याकडे लायसन्स विभाग होता. वाहन चालक प्रशिक्षण संस्थेतील ३० प्रशिक्षणार्थींना पर्मनंट लायसन्स देण्यासाठी लाच प्रकरणात माने सापडले. त्यामुळे त्यांच्याकडील लायसन्स विभागाचा पदभार तत्काळ काढण्यात आला आहे. गुरुवारी ते कार्यालयात हजर झाले, तेव्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांपासून अनेकांनी त्यांची भेट घेतली. तेव्हा झालेली कारवाई ही चुकीची आहे, आपल्याला विनाकारण अडकविण्यात आले असून, याप्रकरणी न्यायालयात लढणार असल्याचे स्वप्निल माने सर्वांना सांगत होते. दरम्यान, अशा कारवाईनंतर निलंबन होईपर्यंत अकार्यकारी पद द्यावे लागते. त्यामुळे त्यांना जप्त वाहनांच्या लिलावाचे काम देण्यात आले आहे.
निलंबनाचे अधिकार शासनाचे
निलंबनाचे अधिकार हे शासनाचे आहेत. निलंबन होईपर्यंत स्वप्निल माने यांना जप्त वाहनांच्या लिलावाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायालयीन आहे. खात्यांतर्गत चौकशी होईल.
- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी