पावसाळ्यातही झकास पेहराव! रेनकोटने कात टाकली ‘स्पोर्टी लूक’ला अधिक पसंती
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 20, 2024 06:56 PM2024-06-20T18:56:58+5:302024-06-20T18:57:31+5:30
यंदा पाऊस जोरदार बरसणार, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
छत्रपती संभाजीनगर : रेनकोट खरेदीसाठी काही चॉइस नसते. प्लेन रंगाच्या रेनकोटची बाजारात गर्दी दिसते. पण आता अशी तक्रार कालबाह्य होत आहे, कारण बाजारात ‘स्पोर्टी लूक’ रेनकोट अवतरले आहेत. यामुळे पावसातही तुमचा पेहराव झकास दिसणार आहे.
यंदा पाऊस जोरदार बरसणार, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. त्यामुळेच जूनआधीच व्यापाऱ्यांनी रेनकोटची पहिली खेप बाजारात विक्रीला आणली. किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने सजवली आहेत.
४० हजार रेनकोट दाखल
शहरात जूनच्या आधीच ४० हजार रेनकोटची पहिली खेप दाखल झाली आहे. त्यांची किंमत १ कोटी ३० लाख ते १ कोटी ६० लाख रुपयांदरम्यान आहे. यातील ३० टक्के रेनकोटची आतापर्यंत विक्री झाली आहे.
स्पोर्टी लूक रेनकोट
यंदा आकर्षण आहे ते स्पोर्टी लूक रेनकोटचे. यातही अनेक व्हरायटी व दोन ते तीन रंगांत रेनकोट उपलब्ध आहेत. वॉटरप्रुफ गॅरंटी दिली जात आहे. लिकेज होणार नाही, अशी पेस्टिंग या रेनकोटची केली आहे. पावसाचा अंदाज घेत आणखी तीन खेपा टप्प्याटप्प्याने येतील. ‘स्पोर्टी लूक’मुळे रेनकोटची विक्री चांगली राहील.
- संजय डोसी, व्यापारी
स्कूटर कट रेनकोट
महिलांसाठी खास स्कूटर कट रेनकोट विक्रीला आले आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांच्या हे रेनकोट पसंतीला उतरले आहेत. विविध फुलांचे, विविध रंगांतील हे रेनकोट आहेत. महिलांसाठी बाजारात २०० ते १२०० रुपयांदरम्यान विविध रेनकोट मिळत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी रेनकोट खरेदी
शालेय गणवेशासोबत रेनकोटची खरेदी केली जात आहे. विद्यार्थ्यांसाठीचे रेनकोट जून व जुलै महिन्यातच मिळतात. नंतर व्यापारी मागवत नाहीत.
लॅपटॉपसाठी रेन कव्हर
आता लॅपटॉप अनेकांच्या सोबतच असतो. महागडे लॅपटॉप पावसाने खराब होऊ नयेत, यासाठी ‘लॅपटॉप बॅग रेन कव्हर’ बाजारात आले आहे. १२५ ते १५० रुपयांदरम्यान ही कव्हर विकली जात आहेत.
यंदा छत्र्यांचे भाव उतरले
दरवर्षी भाववाढ होत असते. मात्र, यंदा पहिल्यांदाच छत्र्यांचे भाव मागील वर्षीच्या तुलनेत ५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. याचे कारण, मागील वर्षी ३५ ते ४० टक्के छत्र्या विक्रीविना राहिल्या होत्या. यामुळे ५ टक्के भाव कमी करून त्या विकल्या जात आहेत. बाजारात छत्र्यांची पहिली खेप दाखल झाली असून, ४० ते ६० हजार छत्र्या बाजारात आल्या आहेत. ६० लाख ते ९० लाखदरम्यान त्यांची किंमत आहे. १६० ते ३२० रुपयांदरम्यान छत्र्या मिळत आहेत.