पानतावणे सरांची विद्यापीठातील ती २० वर्षे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 01:04 AM2018-03-28T01:04:10+5:302018-03-28T10:23:13+5:30
मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञानदानाचा झरा अविरतपणे सुरू होता. याविषयीच्या भावना मराठी विभागातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
विद्यापीठातील मराठी विभागात ८ जून १९७७ रोजी प्रा. गंगाधर पानतावणे यांची सहायक प्राध्यापक म्हणून निवड झाली. त्यापूर्वी नागसेनवनातील मिलिंद विज्ञान महाविद्यालयात १९७२ पासून अध्यापनाचे कार्य केल्याचे मिलिंद विज्ञानचे प्राचार्य डॉ. राठोड यांनी सांगितले.
मराठी विभागात डॉ. पानतावणे यांना चौथ्या क्रमांकाची खोली मिळाली होती. या खोलीतच त्यांनी ८ जून १९७७ ते ३० जून १९९७ पर्यंत कार्य केले. १९९५ ते ९७ या कार्यकाळात त्यांनी मराठी विभागाचे प्रमुखपद भूषविले. या कार्यकाळातही त्यांचे काम याच खोलीतून होत असे. विभागप्रमुखांच्या खोलीत कामानिमित्ताने बसत. उर्वरित वेळी अभ्यास, चिंतन, वाचन करण्यासाठी चौथ्या क्रमांकाच्या खोलीचाच वापर करीत होते. डॉ. पानतावणे यांना कोणताही विषय वर्ज्य नव्हता. मराठीच्या शिक्षकांनी सर्व प्रकारचे साहित्य प्रकार, प्रवाहाच्या विषयात पारंगत असावे, असे त्यांचे मत होते. कारण विद्यार्थ्यांना ज्ञान देताना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विद्यार्थ्यांकडून येऊ शकतो. त्याची तयारी अध्यापकाने केलीच पाहिजे, असाही नियम त्यांनी अध्यापन करताना पाळला.
डॉ. पानतावणे सर मराठी विभागात वैचारिक वाङ्मय शिकवायचे. यात प्रामुख्याने फुले-शाहू-आंबेडकर या विचारांचा समावेश होता. दलित साहित्याचे भाष्यकार असतानाही ज्ञानेश्वरी हा विषय अप्रतिम शिकवत होते. त्यांच्या तासाला विद्यार्थी विषय नसला तरीही बसत. त्यांच्या तोंडून एकदा विषय ऐकला की, पुन्हा त्यावर अभ्यासही करावा लागत नसे, अशी माहिती त्यांचे विद्यार्थी राहिलेले डॉ. दासू वैद्य यांनी दिली.