पिण्याच्या पाण्याची जागा अखेर चकाचक
By Admin | Published: April 20, 2016 12:32 AM2016-04-20T00:32:28+5:302016-04-20T00:40:59+5:30
औरंगाबाद : एस. टी. महामंडळ प्रशासनाने प्रचंड अस्वच्छता असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची जागा अखेर चकाचक केली.
औरंगाबाद : एस. टी. महामंडळ प्रशासनाने प्रचंड अस्वच्छता असलेल्या मध्यवर्ती बसस्थानकातील पिण्याच्या पाण्याची जागा अखेर चकाचक केली. पिण्याच्या पाण्याचा नळ असलेल्या परिसरात अस्वच्छता पसरलेली असताना गेली अनेक महिने महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नव्हते. परंतु ‘लोकमत’मधून वृत्त प्रकाशित होताच या जागेची स्वच्छता करून नेहमीच त्याकडे लक्ष देण्याची सक्त सूचना प्रशासनाने केली
आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाच्या इमारतीवर सिमेंट आणि प्लास्टिकच्या टाक्या आहेत. या टाक्यातील पाणी फ्रिजरमध्ये घेऊन बसस्थानकातील नळातून प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे; परंतु या नळाच्या परिसरातील अस्वच्छतेमुळे तहान भागण्याऐवजी आजारांना आमंत्रण मिळण्यास हातभार लागत आहे. त्यामुळे येथील पाणी पिण्याचे टाळले जात होते. अशा परिस्थितीत बाटलीबंद पाण्याशिवाय पर्याय नव्हता. तरीही या जागेची नियमित स्वच्छता करण्याकडे साफ दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत होता. अनेक प्रवासी पाणी पिण्याचे टाळत होते. परंतु गोरगरीब प्रवाशांना नाईलाजाने हे पाणी प्यावे लागत होते.
या पाण्यामुळे तहान तर भागते. परंतु अस्वच्छतेने प्रवाशांचे आरोग्य मात्र, धोक्यात येत होते. मध्यवर्ती बसस्थानकातील या परिस्थितीचे ‘लोकमत’मधून २७ मार्च रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले. वृत्त प्रकाशित होताच जागे झालेल्या महामंडळ प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची जागा स्वच्छ करण्याची सूचना केली. त्यानंतर ही जागा चकाचक करण्यात आली आहे. नळाच्या परिसरातील स्वच्छतेमुळे पाणी पिण्यासाठी येणारे प्रवासी सुखावत आहेत. यापुढे नेहमी ही जागा स्वच्छ दिसेल, अशी अपेक्षा प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.