वृक्ष संवर्धनासाठी मिळाला ठिबकचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 08:41 PM2019-01-21T20:41:54+5:302019-01-21T20:42:26+5:30
ठिबकद्वारे जवळपास साडेसहा हजार झाडे जतन होणार आहे.
वाळूज महानगर : पर्यावरण संवर्धनासाठी जनसहयोग संस्थेतर्फे गोलवाडी फाट्यालगत तीसगाव हद्दीत छावणी परिषद प्रशासनाच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन केले जात आहे. २०० नवीन जातींच्या वृक्षांची रविवारी लागवड करण्यात आली. पाण्याअभावी वृक्ष जळून जात असल्याने लावलेलेवृक्ष जगविण्यासाठी संस्थेने या ठिकाणी ठिबक बसविण्याचे काम हाती घेऊन कामाला सुरुवात केली आहे. ठिबकद्वारे जवळपास साडेसहा हजार झाडे जतन होणार आहे.
जनसहयोग सेवाभावी संस्थेतर्फे काही वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी संस्थेने अमेझॉन या उपक्रमाअंतर्गत स्वत: वृक्ष लागवड करून नागरिकांमध्ये वृक्ष लागवडीसाठी जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून गोलवाडी फाट्यालगत तीसगाव हद्दीत छावणी परिषदेच्या ४ एकर जागेवर जवळपास साडेसहा हजार वृक्षांच्या रोपांची लागवड केली आहे. यात औषधी असलेल्या देशी ६४ प्रकारच्या प्रजातींचा समावेश आहे. अत्यल्प पाऊस व पाण्याअभावी लावलेले काही वृक्ष जागेवरच जळून जात असल्याने छावणी परिषदेच्या सहकार्याने टँकरने पाणी देऊन झाडांचे संगोपन केले जात आहे. वृक्ष पाण्यावाचून जळू नये म्हणून संस्थेने आता ठिबक बसविण्याचा निर्णय घेतला असून, ठिबकच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवातही केली आहे.
ठिबकसाठी चार ठिकाणी मोठे स्टँड उभारले जात असून, प्रत्येक स्टँडवर प्रत्येकी २ हजार लिटरची पाण्याची टाकी बसविली जाणार आहे. यासाठी प्रशांत गिरे, संतोष कुंडेटकर, कासीम शेख, श्याम जेपल्ली, संदीप जगधने, संतोष वैरागड, कैलास खांड्रे, उद्योजक संदीप गिरे, आकाश निरंजन, जितेश सुरवाड, अनिस अंबाडे,अमजद अली, नंदन जाधव, प्रदीप यादव, नंदकिशोर सोनारे, छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर, नीलेश तणपुरे, संतोष बंसिले आदींसह सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
दररोज दोन तास श्रमदान
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे या जाणिवेतून संस्थेचे पदाधिकारी दररोज सायंकाळी दोन तास येथे श्रमदानातून वृक्षांना आळे करणे, वाढलेले गवत काढणे, पाणी देणे, फांद्याची छाटणी करणे आदी कामे करतात. संस्थेचे प्रयत्न व छावणी परिषदेच्या सहकार्यातून गोलवाडी फाट्याजवळ वाढणारे वृक्ष इतरांसाठी आदर्शवत ठरत आहेत.