परदेशात कार चालवायची? इथेच काढा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स !

By संतोष हिरेमठ | Published: February 8, 2024 05:21 PM2024-02-08T17:21:08+5:302024-02-08T17:21:35+5:30

आरटीओ कार्यालयात सुविधा : आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याकडे कल

Drive a car abroad? Get international driving license here! | परदेशात कार चालवायची? इथेच काढा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स !

परदेशात कार चालवायची? इथेच काढा आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स !

छत्रपती संभाजीनगर : नोकरी, व्यवसायानिमित्त आणि फिरायला परदेशात गेल्यानंतर वाहन चालवता येत असेल तरी लायसन्स नसल्याने ते चालवता येत नाही. अशावेळी भारतातच म्हणजे आपल्या शहरातच आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढता येते.

भारतीय नागरिकांकडे स्थानिक लायसन्स असले तरी विदेशात वाहन चालविण्यासाठी अडवले जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक असते. त्यामुळे परदेशात जाणारे अनेक नागरिक हे लायसन्स काढण्यास प्राधान्य देतात. या लायसन्ससाठी कोणतीही चाचणी द्यावी लागत नाही.

आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स कसे काढाल?
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर आवश्यक कागदपत्र घेऊन आरटीओ कार्यालयात सहायक प्रादेशिक परिहवन अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष हजर राहावे लागते. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर हे लायसन्स दिले जाते.

कागदपत्रे काय लागतात?
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी संबंधित अर्जदाराचे लायसन्स, पासपोर्ट, व्हिसा, आधार कार्ड आणि पासपोर्ट फोटोची आवश्यकता असते.

शुल्क किती?
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी एक हजार रुपये शुल्क आहे. ऑनलाइन अर्ज करताना या शुल्काचा भरणा करावा लागतो.

वर्षभरात ४० जण काढतात आंतरराष्ट्रीय परवाना
आरटीओ कार्यालयात महिन्याला ३ ते ४ जण, तर वर्षभरात जवळपास ४० जण आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स काढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एक वर्षाची मुदत
आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करून आवश्यक कागदपत्रांसह आरटीओ कार्यालयात यावे. सर्व कागदपत्रांची पूर्तता असेल तर अगदी सहजपणे आंतरराष्ट्रीय ड्रायव्हिंग लायसन्स मिळते. या लायसन्सची एक वर्षाची मुदत असते.
- विजय काठोळे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (प्रभारी)

Web Title: Drive a car abroad? Get international driving license here!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.