बसमध्ये चढताच चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:22 AM2020-12-11T04:22:12+5:302020-12-11T04:22:12+5:30
सोयगाव : चालकाने आगारातून बस बाहेर काढून डेपोच्या प्लॉटफार्मवर लावली. त्यानंतर चालक नियंत्रण कक्षात गेले बसची नोंदणी केली. सोयगाव ...
सोयगाव : चालकाने आगारातून बस बाहेर काढून डेपोच्या प्लॉटफार्मवर लावली. त्यानंतर चालक नियंत्रण कक्षात गेले बसची नोंदणी केली. सोयगाव ते धुळे लवकरच निघणार अशी नियंत्रण कक्षाने घोषणा केली. प्रवाशीही बसमध्ये चढले. अन् दहा मिनिटात चालक गाडीच्या दिशेने वळले. स्टेअरिंग कक्षात जाण्यासाठी चढताना त्यांना अचानक चक्कर आली अन् ते खाली कोसळले आणि डेपोत एकच गोंधळ उडाला.परिवहन कर्मचाऱ्यांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पण तोवर उशीर झाला होता. ही चित्तथरारक घटना सोयगाव आगारात घडली असून नागोराव मेश्राम असे मृत चालकाचे नाव आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सकाळी आगारातून बस क्रमांक-एम-एच-२० डी-०५८२ सोयगाव ते धुळे ही बस घेऊन सोयगाव प्लॅटफार्मवर गाडी लावली. प्रवाशीही बसले चालक नागोराव मेश्राम यांनी बसची नोंदणी नियंत्रण कक्षात करून बसच्या कॅबिनमध्ये बसताच ते बेशुद्ध झाले अन् ते खाली कोसळले. परिवहनाच्या कर्मचारी व नागरिकांनी त्यांना तातडीने सोयगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पाचोरा जि. जळगाव येथे हलविण्यात आले. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पाचोरा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान सोयगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांकडे मृतदेह देण्यात आला. या घटनेमुळे सोयगावात एकच गोंधळ उडाला. वाहनचालकांच्या आरोग्याकडे प्रशासन लक्ष घालत नाही का असा प्रश्नही एसटी संघटनेकडून विचारण्यात आला.
कर्तव्यावर मृत्यू ओढावला
सोयगाव-धुळे बस घेऊन चालक नागोराव मेश्राम हे जाण्याच्या तयारीत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. कर्तव्यावरच त्यांचा अंत झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
------
ही घटना दुर्दैवी, पण मोठा अनर्थ टळला
चालक नागोराव मेेश्राम यांना हृदयविकाराचा झटका हा डेपोच्या आवारात आला आणि यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जर बस चालविताना ही घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता. मोठी दुर्घटना टळली गेली, असेही यावेळी बसमधील लोकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. चालकांच्या आरोग्याची काळजी का घेतली नाही, असे म्हणत लोकांनी एसटी महामंडळाविरोधात नाराजी व्यक्त केली.
फोटो - चालक नागोराव मेश्राम