विना अपघात बस सेवा देणारा चालक दुचाकी अपघातात मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 07:06 PM2019-03-22T19:06:59+5:302019-03-22T19:07:52+5:30
मयत प्रभाकर हे सिल्लोड आगारात एसटी चालक होते.
सिल्लोड (औरंगाबाद ) : येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून ही घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रभाकर शंकर रनखांबे ( रा. सिल्लोड ) असे मृताचे नाव असून ते बस चालक होते.
प्रभाकर शंकर रनखांबे व विजय केसापुरे (रा. सिल्लोड ) हे दोघे सिल्लोड येथून सारोळा येथे दुचाकीवर ( एम एच 20 बी व्ही 0344) गेले होते. परत येत असताना सिल्लोड जवळील जल शुद्धीकरण केंद्राजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यानंतर त्यांना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शंकरला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी विजयला पुढील उपचारासाठी औरंगाबाद पाठविण्यात आले. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालका विरुध्द मयताचे वडील शंकरराव शिवाजी रनखांबे यांनी दिलेल्या तक्रार वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत प्रभाकर हे सिल्लोड आगारात एसटी चालक होते. त्यांच्या हातून बसचा कधीही अपघात झाला नाही. मात्र दुचाकी अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.