पैशाच्या वादातून चालकाचा खून; चार दिवसांनंतर जीपमध्ये आढळला मृतदेह, एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 01:13 PM2022-11-16T13:13:50+5:302022-11-16T13:17:32+5:30
रांजणगाव जीप चालकाच्या खून प्रकरणाचा ८ तासांत उलगडा
वाळूजमहानगर: पैशाच्या कारणावरून रांजणगावच्या जीपचालक सुधाकर पुंडलिक ससाणे (वय 35 रा वाघोडा ता मंठा जि जालना, ह मु मंगलमूर्ती कॉलनी, रांजणगाव ) यांचा खून करणाऱ्या आरोपीचा अवघ्या 8 तासात छडा लावण्यात गुन्हे शाखा व वाळूज पोलिसांना यश आले आहे.आरोपी तौफिक रफिक शेख (२४, रा. पत्रा कॉलनी, वाळूज) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
रांजणगाव येथील सुधाकर पुंडलिक ससाणे यांच्याकडे क्रुझर जीप क्रमांक एम एच 29, इ वाय 5827) असून ते किरायेने जीप चालवितात. रविवारी सकाळी 8 वाजता मी भाडे घेऊन जात आहे, असे घरी सांगून सुधाकर ससाणे हे घराबाहेर पडले होते. मात्र चार दिवसांपासून ते घरी न परतल्याने तसेच ते मोबाईल फोन उचलत नसल्याने कुटुंबीय काळजीत पडले होते. सर्वत्र शोध घेऊन ही सुधाकर ससाणे यांचा शोध लागत नसल्याने त्यांचे लहान भाऊ सुभाष ससाणे यांनी मंगळवारी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोहेका राम तांदळे व सुधाकर यांचा लहान भाऊ सुभाष हे दोघे वाळूज परिसरात शोध घेत होते.
बेपत्ता सुधाकर यांचे मोबाईल लोकेशन वाळूजच्या गरवारे कंपनीजवळ येत असल्याने पोहेका राम तांदळे व सुभाष ससाणे यांनी गरवारे कम्पनी समोर शोध मोहीम सुरू केली. यावेळी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास गरवारे कंपनी समोरील सर्व्हिस रोडवर सुधाकर यांची जीप दिसून आली. यानंतर जीपची पाहणी केली असता प्रचंड दुर्गंधी येत असल्याने पोहेका तांदळे यांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपायुक्त उज्जवला वनकर, सहाय्यक आयुक्त अशोक थोरात, वाळूजचे निरीक्षक सचिन इंगोले, सहायक निरीक्षक विनायक शेळके, उपनिरीक्षक लक्षमन उंबरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जीप मधील मधल्या सीटवर पोत्यांत ठेवलेला अर्धनग्न अवस्थेत सुधाकर ससाणे यांचा मृतदेह बाहेर काढत शव विच्छेदन साठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
अवघ्या ८ तासात उलगडा झाला
जीप चालक सुधाकर ससाणे यांचा खून झालेल्या ठिकाणी दोन मोबाईल मिळून आले होते. यातील एक मोबाईल सुधाकर यांचा तर दुसरा मोबाईल आरोपींचा असल्याचा अंदाज घेत पोलिसांनी आरोपीची शोध मोहीम सुरू केली होती. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक व वाळूज पोलिसांनी आज बुधवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास वाळूजच्या पत्रा कॉलनीत छापा मारून संशयित आरोपी तौफिक रफिक शेख (२४) यास ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी तौफिक याची कसून चौकशी केली असता त्याने पैशाच्या वादातून सुधाकर ससाणे याचा खून केल्याची कबुली दिली आहे.