‘चालक देता का चालक’, परिवहन विभागाला हवे ‘एसटी’चे चालक; राज्यभरातील आगारात शोध
By संतोष हिरेमठ | Published: January 17, 2024 05:10 PM2024-01-17T17:10:22+5:302024-01-17T17:17:57+5:30
२०१९ पासून वेटिंगवरील ‘चालक तथा वाहक’च्या उमेदवारांकडे मात्र दुर्लक्ष
छत्रपती संभाजीनगर : परिवहन विभागाला चालक पाहिजे आणि त्यासाठी एसटी महामंडळात कुठे अतिरिक्त चालक आहेत का, याचा राज्यभर शोध घेतला जात आहे. या अतिरिक्त एसटी चालकांना परिवहन विभागात कायमस्वरूपी प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्याच वेळी २०१९ पासून नोकरी मिळण्याच्या आशेवर बसलेल्या वेटिंगवरील ‘चालक तथा वाहक’ पदाच्या उमेदवारांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
एसटी महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी राज्यभरातील एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना एक पत्र पाठविले. विभागातील ज्या आगारात ज्यादा चालक कार्यरत आहेत, त्या आगारातील चालकांना त्याच जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन विभागाकडे प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येणार असून, इच्छुक चालकांचे अर्ज घेण्याची सूचना या पत्रात करण्यात आली आहे.
एसटी चालकांची संख्या अपुरीच
एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात अतिरिक्त चालक नाही. विभागात वाहकांची संख्या अतिशय कमी आहे. त्यामुळे चालक तथा वाहक पदांच्या कर्मचाऱ्यांचा वापर वाहक म्हणून केला जात आहे. एकूण चालक-वाहकांची कमतरता आहे, अशी माहिती विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१९ पासून ६८ जण ‘वेटिंग’वर
एसटी महामंडळाने २०१९ मध्ये चालक-तथा वाहक पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली. यात प्रवर्गानुसार निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली. यात प्रतीक्षा यादीतील ६८ उमेदवारांना अजूनही सेवेत सामावून घेतलेले नाही. परिवहन विभागासाठी या उमेदवारांचा विचार का केला जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सेवेत सामावून घ्यावे
प्रतीक्षा यादीतील सर्व चालक तथा वाहक पदांचे उमेदवार अत्यंत गरीब व शेतकऱ्यांची मुले आहे. सर्वांना सेवेत सामावून घेतले पाहिजे. पालकमंत्र्यांना ही यासंदर्भात निवेदन दिले आहे.
-बाळू तनपुरे, नियुक्तीच्या प्रतीक्षेतील चालक